
सामना प्रतिनिधी । सेनगाव
तालुक्यातील बोडखळी तांडा येथील एका ३३ वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व कर्जबाजारीला कंटाळुन रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती.
सेनगाव तालुक्यातील बोडखळी तांडा येथील शेतकरी नारायण बळीराम जाधव (३३) यांच्याकडे २ एकर कोरडवाहुची शेती आहे. या शेतीत कोणतेही पीक निघत नाही. सततची नापिकी होत आहे. जाधव यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे ५५ हजार रुपयांचे कर्ज व महिन्द्रा फायनासन्सकडून १ लाख रुपये घर बांधकामासाठी घेतले होते. महिन्द्रा फायनान्सच्या व्यवस्थापनाकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी नारायण यांना सतत तगादा लावण्यात येत असल्याने ते चिंतेत होते. सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून शेतामध्ये पेरणी कशाने करावी व खत-बियाणे कशाने विकत घ्यावे या विवंचनेत होते. रविवारी सकाळी साडे दहा वाजता जाधव यांनी त्यांच्या पत्नीला शेतामध्ये धाडले आणि ११ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


































































