हिंगोलीत कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली तालुक्यातील केसापुर येथील अश्रू आनंदा शिंदे (32) या तरुण शेतकऱ्याने बँक व खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. केसापुर येथील आश्रु शिंदे यांची वडिलोपार्जितील सहा एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. शिंदे यांच्यावर बँकेचे 80 हजार आणि खाजगी सावकाराचे 2 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शिंदे होते. खाजगी सावकाराकडून सतत कर्जाच्या रकमेसाठी तगादा लावण्यात येत होता. त्यामुळे शिंदे तणावाखाली होते. रविवारी घरी कोणीच नसल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरची मंडळी जेव्हा घरी परतली, तेव्हा आतून घर बंद होते. अनेकदा आवाज दिल्यावरही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी दरवाजा तोडुन घरात प्रवेश केल्यावर शिंदे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती नरसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.