पारनेरमधील पळशी येथे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

पारनेर तालुक्यातील पळशी येथील अण्णासाहेब हरीभाऊ गागरे (वय 32) या तरूण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठठी सापडली असून त्यात काही व्यक्तींची नावे आढळून आल्याचे सांगण्यात आले.अण्णासाहेब शनिवारी सकाळी उठले नाहीत म्हणून घराची खिडकी उघडून डोकावले असता त्यांनी पत्र्याच्या छताच्या पाईपला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. उपसरपंच अप्पासाहेब शिंदे यांना त्याबाबत माहीती देण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी पळशी येथे जाऊन दरवाजा तोडून अण्णासाहेब यांचा लटकलेला मृतदेह खाली घेतला. टाकळीढोकेश्‍वर येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अण्णासाहेब यांनी गळफास घेतला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय काही नातेवाईकांनी व्यक्त केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अण्णासाहेब यांचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. अण्णासाहेब यांच्याजवळ सापडलेल्या चिठठीतील हस्ताक्षराची पडताळणी करून त्यातील मजकुराप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे सहाययक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. साकूर तालुका संगमनेर येथील विहीर ठेकेदार तसेच एक ट्रक ड्रायव्हर अण्णासाहेब यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची माहिती पुढे आली आहे. सर्व गोष्टींचा बारकाईने तपास करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अण्णासाहेब यांचे चुलते गंधाधर गणपत गागरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीढोकेश्‍वर दुरक्षेत्राचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या