ऍपल बोरांना दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्य़ात सरासरीच्या दीडपट पाऊस झाल्याने खरीप हंगामाचे नुकसान झाले असले तरी त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. बहुसंख्य फळभागधारकांना जास्तीच्या पावसाचा फायदा झाला. पावसामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावली. साहजिकच फळबागांना भरपूर प्रमाणात पाणी देण्यात आले. त्याचा परिणाम फळांच्या उत्पादनावर झाला आहे. बाजारात आलेल्या ऍपल बोरांची सध्या सर्वदूर चर्चा सुरू आहे. पेरूच्या आकाराशी स्पर्धा करणाऱ्या ऍपल बोराने साऱ्यांना आकर्षित केले आहे. पण अपेक्षित दर मिळत नसल्याने बोरबागा साकारणारे शेतकरी नाराज आहेत.

जिल्ह्य़ातील चिंचवार, कापडणे, निकुंभे, चौगाव, गोताणे अशी अनेक गावे शेतकऱ्यांच्या प्रयोगांमुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहेत. कमी पाऊस, भूगर्भातील पाण्याची खालावणारी पातळी यामुळे पारंपरिक उत्पादन घेणे महागडे ठरू लागले. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी फळबागा साकाराल्या. यंदा जास्तीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान केले. पण फळबागांना त्याचा फायदा झाला. पाण्याची पातळी उंचावल्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागांना भरपूर पाणी घातले. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी पेरूच्या आकाराशी स्पर्धा करणाऱ्या ऍपल बोर तसेच चमेली बोरांची लागवड केली. सध्या बाजारात ऍपल बोर मोठ्या प्रमाणात आले आहेत.
ऍपल बोरांशिवाय चमेली बोरेदेखील बाजारात येत आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्य़ातून अहमदाबादी या नावाने ओळखली जाणारी बोरेदेखील बाजारात आली आहेत. सफरचंदाच्या चवीशी बरोबरी साधणाऱ्या ऍपल बोरांची शहरी आणि ग्रामीण नागरिकांकडून सध्या खरेदी होत आहे.

शेतकऱ्यांना किलोमागे मिळतो 4 ते 5 रुपये दर
शेतकऱ्यांकडून चार ते पाच रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी ऍपल बोरांची खरेदी करीत आहेत. शहरात दररोज शंभर पोतीपेक्षा जास्त बोरांची आवक होत आहे. किरकोळ विक्रेत्यांना ही बोरे बारा ते पंधरा रुपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहेत. सध्या ग्राहकांसाठी 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दराने बोरे दिली जात आहेत. परंतु बोरे जास्त काळ टिकणारी नसल्याने दुपारी चारनंतर किरकोळ विक्रेतेदेखील विक्रीच्या दरात कपात करतात. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळण्याच्या अपेक्षा मावळल्या आहेत.