
सामना प्रतिनिधी । कुडाळ
पावशी ग्रामपंचायत व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शांतादुर्गा हॉल, पावशी येथे नुकताच शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषीविषयक विविध योजनांची सविस्तर माहिती यावेळी उपस्थित शेतकरीवर्गाला देण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम बनावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.
सरपंच भिकाजी (बाळा) कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, तालुका कृषी विभागाचे अधिकारी श्री. कांबळे, सरमरळकर, पंचायत समिती कृषी विभागाचे सखाराम सावंत, रसाळ, पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. के. मळीक, आरसीएफचे मॅनेजर गोवेकर ग्रामसेविका सौ. खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्य सागर भोगटे, प्रसाद शेलटे, यशश्री तेली, खोत, भाग्यश्री पावसकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना कृषि विषयक माहिती व विविध योजना, शेतीविषयक मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचीही माहीती देण्यात आली. सरपंच कोरगांवकर तसेच प्रमोद भोगटे यांनी मार्गदर्शन केले. गावात शेकतरी ग्रुप स्थापन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. या मेळाव्याला आरसीएफचेही सहकार्य मिळाले.





























































