
सामना प्रतिनिधी । पुणे
शेतकरी कर्जमाफी, दुधाला भाव, शेतमालाला हमीभाव या मागण्यांसाठी गेल्या वर्षी पुणतांबा येथून शेतकऱयांच्या ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली होती. सरकारने आंदोलक शेतकऱयांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर कर्जमाफीही जाहीर केली, मात्र आज वर्ष उलटूनही अनेक शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शिवाय दुधाला भाव, शेती उत्पादनांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करण्यात सरकारकडून चालढकल करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱयांनी आज पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सांगली, सोलापूर या जिह्यांमध्ये संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
शेतकऱयांच्या ऐतिहासिक संपाला वर्षभरापूर्वी आजच्या दिवशी सुरुवात झाली होती. जिह्यातील पुणतांबा येथे राज्यव्यापी बैठक होऊन संपाचा ऐतिहासिक निर्णय याच दिवशी झाला होता. त्याची आठवण आज या आंदोलनाच्या निमित्ताने सर्वांनाच झाली असून पुन्हा याच दिवशी आपल्या न्याय्य हक्कासाठी बळीराजा रस्त्यावर उतरला आहे. १ ते १० जूनपर्यंत हा संप सुरू राहणार असून शेवटच्या दिवशी देशव्यापी संप होणार आहे.
अकोल्यात किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज आयोजित केलेल्या तहसील कार्यालयाला घेराव घालण्याबरोबरच या कार्यालयासमोर दूध ओतून सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. या आंदोलनाला शेतकऱयांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शाहरातील महात्मा फुले चौकातून काढलेल्या विराट मोर्चाने या आंदोलनाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी बंद केलेले गेट शेतकऱयांनी उघडायला भाग पाडत आवारात प्रवेश करून आंदोलन केले.
पुणतांब्यात शेतकऱयांनी काळी गुढी उभारून सरकारचे श्राद्ध घालून निषेध केला. प्रहार संघटनेच्या वतीने नगर तहसील कार्यालयासमोर भाकड जनावरे बांधून धरणे आंदोलन करण्यात आले. नगर जिह्यातील संगमनेर, पुणे जिह्यातील खेडशिवापूर आणि आळेफाटा येथे शेतकऱयांनी टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून निषेध केला, तर सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सध्या संप नको
सांगली – यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पेरणीच्या काळातच शेतकरी संपावर गेला तर शेतकऱयांचेच नुकसान होईल. पिके चांगली आली पाहिजेत. त्यामुळे आताच्या घडीला शेतकरी संप किंवा आंदोलनाची गरज नाही असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. आता आंदोलन करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवाय राज्यपालांना भेटून विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती करणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.
पंजाब, हरयाणासह देशभरात संपाचे लोण
शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, दुधाला योग्य दर आदी मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी आजपासून १० जूनपर्यंत संपावर गेले आहेत. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये बळीराजाच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहराला पुरवठा होणारा भाजीपाला, दुधाचा पुरवठा रोखण्यात आला. त्यामुळे येत्या २-३ दिवसांत शहरांत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया किसान महासंघाने आंदोलनाची हाक दिली असून, देशभरातील १३० शेतकरी संघटना यात सहभागी झाल्या आहेत. १ ते १० जून काळात शेतकरी संप करणार आहेत. १० जूनला देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
महाराष्ट्रातून संपाची सुरुवात
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकरी संपावर गेला होता. देशाच्या इतिहासात शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच घटना होती. या संपाचे लोण मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांत पसरले. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे बळीराजा या वर्षी पुन्हा संपावर गेला आहे.
मध्य प्रदेशात कडेकोट बंदोबस्त
– गेल्या वर्षी मध्य प्रदेशात शेतकरी संपावेळी पोलिसांनी मंदसौर जिल्हय़ात गोळीबार केला होता. यात सहा शेतकऱयांचा मृत्यू झाला होता.
– आजपासून मध्य प्रदेशात शेतकरी संपावर गेला आहे. मंदरसौरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंदसौर, रतलाम, नीमचसह अनेक ठिकाणी हायऍलर्ट जारी केला आहे.
– अनेक शहरांमध्ये भाजी मार्केट बंद होते. शहरांना भाजीपाला, दुधाची टंचाई जाणवू लागली आहे.
– मध्य प्रदेशातील शेतकऱयांनी आंदोलनाला ‘गाव बंद’ असे नाव दिले आहे अशी माहिती राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे निमंत्रक शिवकुमार शर्मा यांनी दिली. २२ राज्यांमध्ये शेतकरी संप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पंजाब, हरयाणात दूध, भाजीपाला रोखला
– पंजाबमध्ये शेतकऱयांनी केंद्र सरकारचा निषेध करीत अनेक ठिकाणी आंदोलन केले. शहरांचा भाजीपाला, दूध पुरवठा रोखल्याचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीरसिंग राजवाल यांनी सांगितले.
– हरयाणात अनेक ठिकाणी शेतकऱयांनी महामार्गावर भाजीपाला फेकला, दूध ओतले. शहरांचा पुरवठा रोखला असल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे हरयाणा प्रदेश अध्यक्ष गुरूनाम सिंग यांनी सांगितले.
– राजस्थान, उत्तर प्रदेशातही शेतकऱयांचा संप सुरू झाला आहे. सुमारे २२ राज्यांतील शेतकरी संपावर गेले आहेत.
शेतकऱयांच्या प्रमुख मागण्या
– शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमीभाव.
– शेतकऱयांची संपूर्ण कर्जमाफी करावी. कुक्कुटपालन, ठिबक सिंचन, ग्रीन हाऊस या पूरक व्यवसायांनाही कर्जमाफी द्यावी.
– दुधाला हमीभावासाठी कायदा करा.
– शेतकऱ्याला पत्नीसह निवृत्तीवेतन द्या.
– शेती उत्पादनाला जोखमीचा कायदा करा.
– बैलगाडा शर्यतीला कायदेशीर मान्यता द्या.




























































