पीक विमा भरण्यासाठी रात्रंदिवस शेतकरी रांगेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सावळदबारा (बीड)

पीक विमा भरण्याची मुदत संपत आल्याने सावळदबारा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये रविवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या.

महाराष्ट्र ग्रामीण बँक दररोज १०० शेतकऱ्यांना टोकन देऊन त्याचे पीक विम्याची फाईल घेत असल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना परत जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. उद्या मंगळवारी पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. पीक विम्यापासून वंचित राहू नये म्हणून रात्री व सकाळी शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गर्दी करत आहे. शेतातील कामे सोडून बँकेसमोर रांग लाऊनही नंबर लागत नाही. सावळदबारासह बारा खेड्यांतील शेतकऱ्यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते आहे. सावळदबारासह डाभा, नांदातांडा, घाणेगाव, मोलखेडा, पळसखेडा, पिंपळवाडी, मूर्ती, देव्हारी, महालब्धा, टिटवी, हिवरी, नादागाव, तसेच परिसरातील गावातील शेतकऱ्यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते आहे.

दररोज चारशे ते पाचशे शेतकरी बँकेसमोर रांगेत उभे राहून नंबर लावतात. तर महाराष्ट्र ग्रामीण बँक १०० शेतकऱ्यांना टोकन देऊन त्यांच्या फायली घेते. बाकीच्या शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा यावे लागते. त्यामुळे दररोज दर १०० शेतकऱ्यांची पीक विमा फाईल घेत असल्यामुळे या भागातील शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते व शेतकऱ्यांनी केली आहे.