रेशीम उद्योगाने बदलले शेतकऱ्याचे आयुष्य

52

सामना प्रतिनिधी । औसा

तालूक्यातील मौजे आशिव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने तुतीची लागवड करुन वेगळी वाट धरली. त्यातुन कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असल्याने परिसरातील शेतकरी भेट देऊन पाहणी करत असल्याचे दिसून येत आहे.

आशिव येथील अल्प भूधारक शेतकरी गोविंद बनसोडे यांनी वेगळी वाट निवडत रेशीम उद्योगात उतरण्याचा मार्ग निवडला. सुरुवातीला त्यांना याविषयी जास्त प्रमाणात माहिती नव्हती आणि अनेक लोकांनी कशाला यात पडतो असेही सांगितले होते. पण आशिवचे शेतकरी रमेश वळके पाटील यांच्यावर विश्वास ठेवून गोविंद बनसोडे या शेतकऱ्याने तुती लागवड करण्याचे ठरवले. यासाठी त्यांना पंडितराव काकडे आणि गावातील इतर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी मदत केली. गोविंद बनसोडे यांनीही मग मागे वळून न पाहता ही शेती यशस्वी करून दाखवली आहे आणि शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या तरुण पिढीला आदर्श निर्माण करून दिला आहे.

पहिल्या टप्प्यात त्यांना ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले असून आता त्यांचा दुसरा लॉट तयार आहे. त्यामुळे एकेकाळी केवळ रोजगारावर अवलंबून असणारे हे कुटुंब आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या