हजारो शेतकरी, कष्टकरी, आदिवासींचा लाँगमार्च

केंद्र सरकारचे जाचक कृषी कायदे रद्द करा, कांद्याला हमीभाव, आदिवासींच्या जमिनी नावावर करा आदी मागण्यांसाठी नाशिकच्या दिंडोरीपासून सुरू झालेले बळीराजाचे ‘लाल वादळ’ आज कसाऱ्यात येऊन धडकले. आपल्या न्याय्य हक्कांसाठी काढलेला हा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने आगेकूच होत असून मागण्या मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या या लाँगमार्चमध्ये हजारो शेतकरी, कामगार, आदिवासी सहभागी झाले आहेत. त्यात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतचा समावेश असून हे कष्टकरी 12 किलोमीटरचा अवघड घाट पार करीत कसाऱ्यापर्यंत आले आहेत. या मोर्चामध्ये सीटू, शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, बीवायएफआय, विद्यार्थी संघटना अशा अनेक संघटना सामील झाल्या आहेत.

सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दादा भुसे, अतुल सावे व अभिमन्यू पवार यांनी शहापूर येथे धाव घेऊन तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. रात्री साडेआठ ते साडेदहा अशा तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक बोलणी झाल्याचे शिष्टमंडळाचे जे. पी. गावित यांनी स्पष्ट करून उद्या बुधवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक यशस्वी झाल्यास लॉंग मार्च थांबविण्यात येईल अन्यथा लॉंग मार्च विधान भवनावर धडकणार असल्याचे स्पष्ट केले.

भोंगे, खोके, जातीचे राजकारण करणारे फसवे सरकार

शेतकरी तसेच कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. पण फक्त भोंगे, खोके, हनुमान चालीसा आणि जातीचे राजकारण करणाऱ्या फसव्या सरकारला आमच्यासाठी वेळ नसेल तर आम्हाला आत्मक्लेश करावा लागेल, असे जोरदार टीकास्र कॉम्रेड अजित नवले यांनी केले आहे. माता-भगिनींच्या पायाला पह्ड आले असून अनेकजण जखमी झाले आहेत. तरीदेखील या फसव्या सरकारला दया का येत नाही, असा संतप्त सवालही त्यांनी केला.