निफाडमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कांदे रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निफाड

शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी निफाड शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते. आज शहराचा आठवडे बाजार असूनही दुपारपर्यंत शेतकऱ्यांसहित व्यापारी वर्गानेदेखील स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून शेतकरी संपास पाठिंबा दिला. सकाळी ९ च्या दरम्यान शेतकरी येथील शांतीनगर चौफुलीवर एकत्र आले. या वेळी रस्त्यावर कांदे फेकून तसेच बैलगाडय़ा उभ्या करून रास्ता रोको केला. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, पेट्रोल पंपाचे डिलिव्हरी पाइप पारदर्शक करावे, शेतकऱ्यांना डिझेलवर अनुदान मिळावे, बेजबाबदार वक्तव्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री यांचा राजीनामा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी व कृषीमंत्री तसेच अभिनेत्री रविना टंडन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, बिबटय़ांचा बंदोबस्त करण्यात यावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास २४ तासांच्या आत नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

भाजप सरकार स्वतःच्याच हाताने पाठ थोपटून घेणारे सरकार आहे, अशा तीव्र स्वरूपात शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर अनिल कुंदे, सुभाष कराड, भीमराज काळे, संपत व्यवहारे, शिवाजी ढेपले, देवदत्त कापसे, राजेंद्र बोरगुडे, रमेश जाधव, कैलास धारराव, कैलास कुंदे, मोहन जाधव, साहेबराव कापसे, कृष्णाशेठ नागरे, नवनाथ धारराव, महेंद्र गोळे, धनंजय कुंदे, जानकीराम धारराव, शरद ढेपले, बाळासाहेब पेंढारकर, संतोश राऊत, सुरेश जाधव, माणिक गायकवाड, शशिकांत ढेपले, अरुण तांबे, हेमंत धारराव, महेंद्र कापसे, भाऊसाहेब बनकर, कृष्णराज बनकर, तुळशीराम वाघचौरे, अरुण जाधव, गोकुळ जाधव, शिवाजी जाधव, मोहन व्हवहारे, केशव गायकवाड, रमेश सानप, सुरेश कुंदे, सदाशिव कुंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.