कर्जाला कंटाळून अमरावतीच्या शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अमरावती

सततची नापिकी, त्यामुळे डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर याला कंटाळून जिह्यातील तुरखेड येथील शंकरराव चोपडे या शेतकऱयाने गळफास घेतला. कट्टर शिवसैनिक असलेल्या चोपडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात कर्जाची माहिती दिली आहे आणि आपल्या भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवाव्यात, अशी विनंतीही केली आहे.

अंजनगाव तालुक्यातील तुरखेड येथील शंकरराव चोपडे (51) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पडणारे अवर्षण, नापिकी आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे ते अस्वस्थ होते. याच मनःस्थितीत मंगळवारी त्यांनी गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी अंजनगाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची संपूर्ण माहिती दिली आहे. याच पत्रात त्यांनी मी विश्वासू शेतकरी असून या भावना माझे खास हितचिंतक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कळविण्यात यावी अशी विनंती केली आहे.

निष्ठावंत शिवसैनिक शंकरराव चोपडे यांच्या आत्महत्येची बातमी कळताच शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे, विकास येवले, कपिल देशमुख आदींनी त्यांच्या घरी जाऊन चोपडे कुटुंबाचे सांत्वन केले.

सुप्रिया सुळेंच्या सभेत शेतकऱयाचा आत्महत्येचा प्रयत्न
संगमनेर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असताना भूमिहीन शेतकऱयाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असताना अगस्ती कारखान्याच्या उभारणीत भूमिहीन झालेले शेतकरी दत्तात्रय शेणकर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांनी व कार्यकर्त्यांनी शेणकर यांना बाजूला ढकलत नेले. यावेळी एका सुरक्षारक्षकाने शेणकर यांना मारहाण केली.