
सामना प्रतिनिधी । जिंतूर
जिंतूर तालुक्यातील भोसी येथील अल्पभूधारक एका कर्जबाजारी शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थिती व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना आज शनिवार, १३ जुलै रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील भोसी येथील शेतकरी सखाराम गंगाराम गायकवाड (६५) वर्ष या शेतकऱ्याची चार एकर शेती आहे. मागील तीन वर्षांपासून सतत पडत असलेला दुष्काळ, त्यातच वाढत चालले बँकेचे कर्ज, यामुळे ते नेहमीच विवंचनेत असत. यातच यावर्षी तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाची अवकृपा, सध्या पेरणी केलेली असून पावसाने दगा दिल्याने पीक येईल की नाही? याची धास्ती, शिवाय बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवचंनेत ते मागील अनेक दिवसांपासून चिंतेत होते. यातूनच त्यांनी आज स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना त्यांच्या नातेवाईकांना सकाळी समजली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा मोठा परिवार आहे.


























































