स्वत:च रचलेल्या पेटत्या चितेत उडी मारुन शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

आपल्यावर झालेले साडेचार लक्ष रुपयांचे कर्ज, सततची नापिकी आणि दिवाळीचा सण साजरा कसा करावा या विवंचनेत असलेल्या उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील पोतन्ना बोलपीलवाड (६०) याने स्वतःचेच सरण आपल्या शेतात रचून पेटत्या चितेत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

अत्यंत धार्मिक असलेल्या वारकरी सांप्रदायातील पोतन्ना बोलपीलवाड यांची सर्व उपजिविका शेतीवर होती. कोरडवाहू जमिन कसत ते आपली व कुटुंबियांची उपजिविका भागवत असत. त्यांच्यावर साडेचार लक्ष रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगा, जावाई, सूना, नातू असा परिवार आहे. शेतीसाठी त्यांनी घेतलेले कर्ज सरकारच्या कर्जमाफीच्या यादीत बसले नाही. कर्जमाफीसाठी अर्ज करुनही त्यांचे कर्ज माफ झाले नाही. आलेल्या दिवाळीत आपल्या लेकरा-बाळांना आणि कुटुंबियांना कपडे कसे घ्यायचे, सण कसा साजरा करायचा या विवंचनेत ते होते. काल मध्यरात्री हा सर्व विचार करत त्याने आपले शेत गाठले आणि स्वतःचे सरण रचले. आणि पेटत्या चितेत त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि आत्महत्या केली.

दुष्काळ आणि नापिकीमुळे बोलपीलवाड यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने प्रशासनात मात्र खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, पोलिसांनी या घटनेचा पंचनामाही केला. सणासुदीत या शेतकऱ्याने नैराश्यापोटी आत्महत्या केल्याने तुराटी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत सरकारने दुष्काळात शेतकऱ्यांची चेष्टा चालविली आहे. चुकीचे धोरण आणि कर्जमाफीचे किचकट निकष यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवायला हवा, अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोलपीलवाड यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे तीन लाखाचे तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पन्नास हजार रुपयांचे कर्ज होते. त्यांना सात एकर जमीन होती. त्यांच्या चार मुलींची व एका मुलाचे लग्नही झाले होते. कर्जमाफीचे अर्ज करुन देखील ते निकषात बसले नाही, त्यामुळे त्यांची कर्जमाफी झाली नाही, यामुळे ते निराश होते. त्यातच त्यांनी स्वतःचे सरण रचून चितेमध्ये उडी घेतली आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला.