
कृषी विद्यापीठाने सन 2025-26 मध्ये विविध पिकांचे 8456 क्विंटल बियाणे तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिकांच्या वाणांचे सत्यप्रत बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. बीजोत्पादन हे विद्यापीठाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात बियाणे उत्पादन आढावा व खरीप हंगामासाठीची बियाणे उत्पादनासंबंधीचे नियोजन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षपदी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके होते.
कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उत्कृष्ट बियाणे उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त बीजोत्पादन घेणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हे करत असताना जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात जैविक खते तसेच कंपोस्ट खते द्यायला हवीत.
डॉ. आर. पी. आंधळे यांनी ‘अल निनो’चा येत्या खरीप हंगामावर पडणारा प्रभाव’, तीळ पैदासकार डॉ. एस. डी. राजपूत यांनी ‘तीळ, मूग व उडीद उत्पादन तंत्रज्ञान’, सोयाबीन पैदासकार डॉ. ए. बी. राजगुरू यांनी ‘सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान’, डॉ. नरेंद्र काशीद यांनी ‘भात उत्पादन तंत्रज्ञान’, तर डॉ. महेश भारती यांनी ‘तूर उत्पादन तंत्रज्ञान’ यावर सादरीकरण केले. डॉ. कैलास गागरे यांनी कृषी विद्यापीठ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतपिकांच्या बीज उत्पादन कार्यक्रमांचे, तर डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी ‘भाजीपाला बीज उत्पादन’ व डॉ. बी. टी. पाटील यांनी ‘फळ पिकांच्या रोपे उपलब्धीची’, डॉ. राजेंद्र भिलारे यांनी विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ऊस बीजोत्पादन त्याचप्रमाणे डॉ. उत्तम कदम, डॉ. आर. टी. गायकवाड, डॉ. भीमराज कांबळे या विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत ‘उत्पादित विविध फळे पिकांच्या रोपांची उपलब्धता, जैविक खते, जैविक औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये’ तसेच डॉ. उल्हास गायकवाड यांनी ‘गांडूळ खत’ निर्मितीबाबत माहिती दिली.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. साताप्पा खरबडे व नियंत्रक सदाशिव पाटील, डॉ. नरेंद्र काशीद उपस्थित होते. डॉ. प्रशांत बोडके यांनी विद्यापीठ तयार करत असलेल्या विविध पिकांच्या बियाण्यांसंदर्भात सविस्तर माहिती दिली.




























































