बैलजोडी गेली, शेतीतील मशागत सध्या पॉवरटिलरवर

69

सामना प्रतिनिधी । गारगोटी

पिंपळगाव परिसरात लावणी जोरात सुरु आहे. शेतकरी रोप लावणीत व्यस्त आहेत. पाऊस कधीतरी साथ व अचानक हुलकावणी देत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. थोड्या पाण्याच्या आधारे व थोडा पाऊस यावर लावणी सुरू आहे. पण पिढ्यान् – पिढ्या बैलजोडी पासुन केली जाणारी शेतीतील मशागत सध्या पॉवरटिलरच्या सहाय्याने केली जात आहे. बैलांची संख्या कमी होत असून शेतीची यांत्रीकीकरणावर मशागत केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे पुर्वापार शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैलजोडी हमखास असायची. बैलांमुळे शेतकऱ्यांचा गोठाही भारदस्त दिसायचा. त्यावेळी बैलांच्या किमतीही आवाक्यात असायच्या. तसेच अनेक शेतकरी जातीवंत गायीच्या पोटी खिल्लारी बैलांची पैदास करत होते. मात्र गेल्या अनेक वर्षात शेतीच्या मशागतीत यांत्रिकीकरणाला वेग आला आहे. तसेच जातिवंत बैलांची पैदासही घटली आहे. त्यामुळे बैलांची संख्याही घटली आहे.

गोठ्यातील बैलांची जागा गाई – म्हैशींनी घेतली आहे. त्यामुळे गोठ्यातील बैलही कमी झाले. बैलजोडीचे दर गगनाला भिडले. पुर्वी आठ – दहा हजारांत येणारी बैलजोडी आता ७० ते ८० हजारांवर पोहोचली आहे. पुर्वी गावोगावी बैलांची रेलचेल असायची. सध्या कुठेतरी अपवादानेच बैलजोडी पहावयास मिळत आहे. महागाईच्या युगात बैलांची वैरण व भरडा(खाद्य)ही परवडत नाही. शेतीप्रधान कोल्हापूर जिल्ह्यात बैलांची संख्या वेगाने घटत आहे.

पूर्वी रोपलावणीसाठी शिवारभर चिखल करताना दिसणाऱ्या बैलजोड्या व त्यांच्या गळ्यातील वाजणाऱ्या घुंगरांचा आवाज दुर्मिळ होत चालला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या