
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची आज पक्षातील नेत्यांनी भेट घेतली. तब्बल दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच पक्षातील नेत्यांना भेटून फारुख यांचा चेहरा खुलला. 15 नेत्यांच्या शिष्टमंडळाने ओमर अब्दुल्ला यांचीही श्रीनगर येथे भेट घेतली.
कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. मात्र, यातील काही नेत्यांची आधीच सुटका झाली आहे. पण, चिथावणीखोर वक्तव्ये करणारे अब्दुल्ला पिता-पुत्र आणि मेहबुबा मुफ्ती हे अजूनही नजरकैदेत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी अब्दुल्ला पिता-पुत्रांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केली होती. परवानगीनंतर नेत्यांनी आज भेट घेतली. पीडीपीचे नेते उद्या सोमवारी मेहबुबा मुफ्ती यांना भेटणार आहेत.


























































