
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना चांगलेच सुनावले. दिल्ली असो वा सीमेपलीकडील इतर कुणी, आम्ही कुणाच्याही हातचे बाहुले नाही. पाकिस्तानने जम्मू-कश्मीरातील राजकीय पक्षांचा नेहमीच दुरुपयोग केला आहे. आता याच पाकिस्तानला अचानक आमचा पुळका कसा काय आला, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानचे कान उपटले.
कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात सहा राजकीय पक्ष एकत्रित लढा देणार असल्याच्या गुपकार घोषणेचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी स्वागत केले. सहा पक्षांचे घोषणापत्र ही एक महत्त्वपूर्ण घडामोड असल्याचे ते म्हणाले. त्यावर फारुख अब्दुला यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. आम्ही कुणाच्याही हातचे बाहुले नसल्याचे बजावतानाच आम्ही केवळ जम्मू-कश्मीरच्या लोकांना उत्तर देण्यास बांधील आहोत. त्यांच्यासाठीच काम करणार आहोत, असे स्पष्ट केले. जम्मू-कश्मीरातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, काँग्रेससह सहा पक्षांनी कलम 370 पूर्ववत लागू करण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्णय 22 ऑगस्टला गुपकार घोषणापत्राद्वारे जाहीर केला आहे.
पाकिस्तानने कश्मीरात दहशतवादी धाडणे थांबवावे
कश्मीरात शस्त्रधारी लोक (दहशतवादी) पाठवणे थांबवा, अशी ताकीद फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला दिली आहे. आम्हाला जम्मू-कश्मीरातील रक्तपात थांबवायचा आहे. शांतता राखण्यासाठी स्थानिक राजकीय पक्ष कटिबद्ध आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने चर्चेतून तोडगा काढावा. ते सर्वांच्या हिताचे आहे, असेही अब्दुल्ला यांनी यावेळी नमूद केले.

























































