टेरर फंडिंगशिवाय हल्ला शक्य नाही, एफएटीएफकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

एप्रिल महिन्यात जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला व अनेक पर्यटक जखमी झाले; मात्र टेरर फंडिंगशिवाय हा हल्ला शक्य नाही, असे स्पष्ट करत एफएटीएफकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात एफएटीएफची प्रतिक्रिया समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक गैरव्यवहार, दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला असणाऱ्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व बाबींवर एफएटीएफ नजर ठेवून असते. त्यासंदर्भात इतर देशांसाठी आवश्यक ते नियम, मार्गदर्शक सूची आणि अंमलबजावणीचे निर्देश या संस्थेमार्फत नमूद केले जातात. एफएटीएफने 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच दहशतवादी समर्थकांमध्ये पैशांशिवाय आणि पैशांच्या हस्तांतरणाच्या साधनांशिवाय हे हल्ले होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. याशिवाय या भ्याड हल्ल्याबाबत एफएटीएफकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला करत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता; मात्र त्यानंतर तणाव काहीसा निवळला.