
एका बापाने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आपल्या 23 वर्षांच्या मुलीची अंत्ययात्रा काढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी जिवंत असून मुलीचा पिठाचा पुतळा बनवून तिच्यावर शोकाकुल वातावरणार स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्यांसह गावातील नागरिक उपस्थित होते. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वच चकीत झाले आहेत.
विदिशा शहरातील चुना वाली गल्ली येथे राहणाऱ्या कुशवाहा कुटुंबाने हे धक्कादायक पाऊल उचललं असून आपल्या जिवंत मुलीवर अंत्यसंस्कार केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षांची सविता कुशवाहा काही दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि नातेवाईकांमध्ये मुलीची चौकशी केली. परंतू तिचा काही थांगपत्ता लागला नाही. काही दिवसांनी कुटुंबाला समजलं, की सविता एका मुलासोबत पळून गेली आहे आणि तिने त्याच्यासोबत लग्न सुद्धा केले आहे. सविताच्या लग्नाची बातमी घरात कळताच आई-वडिलांसह कुशवाहा कुटुंबाच्या पायखालची जमीन सरकली. मुलीच्या या निर्णयाचा त्यांना जबर धक्का बसला. त्यामुळे कुटुंबाने मुलीच्या पिठाचा पुतळा बनवला आणि तिची अंत्यायात्रा काढत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खद क्षण आहे, असे मुलीचे वडील रामबाबू कुशवाह यांनी सांगितले.



























































