प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘एफसीएफएस’ फेरी, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर मिळणार प्रवेश

24

सामना ऑनलाईन । मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नियमित फेरीत मिळालेला प्रवेश रद्द केल्यामुळे अद्याप प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘एफसीएफएस’ फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर कॉलेजस्तरावर प्रवेश दिला जाणार असून लवकरच या फेरीचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयातून जाहीर होणार आहे.

चार गुणवत्ता याद्या जाहीर होऊनही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट होऊनही दिलेल्या मुदतीत प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे ते ऑनलाइन प्रक्रियेच्या बाहेर गेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘एफसीएफएस’ फेरी राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली.

दहावी फेरपरीक्षेत पास होणारेही प्रतीक्षेत

जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थीही अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थीही प्रवेशाच्या रांगेत आहेत. विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशफेरी राबविली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या