संजयनगर शाळेतील गोळ्यांचे नमुने एफडीएच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गोवंडीतील संजयनगर पालिका शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू फुप्फुसातील रक्तस्रावामुळे झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आता शाळेत देण्यात आलेल्या गोळ्यांचे नमुने एफडीएने ताब्यात घेतले आहेत. या गोळ्यांची वैद्यकीय चाचणी करून आठवडाभरात हा अहवाल सादर केला जाणार आहे. गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील चांदणी शेख (१२) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर २१९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शाळेत दिल्या जाणाऱ्या फॉलिक ऑसिड आणि लोहाच्या गोळ्यांमुळे हा प्रकार घडल्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र शाळेत देण्यात येणाऱ्या गोळ्या रक्तवाढीच्या असून त्या सोमवारी देण्यात आल्या होत्या. तर चांदणीचा मृत्यू गुरुवारी रात्री झाला होता. मात्र मुलं आणि पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाल्याने एकच धावपळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शाळेत देण्यात येणाऱ्या फॉलिक ऑसिड आणि लोहाच्या गोळ्यांचे नमुने एफडीएने ताब्यात घेतले आहेत.