अभिप्राय – संवेदनशील कथाबीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता येंडे

काही साहित्यकृती या आपल्याला कल्पनाविलासात रममाण व्हायला लावतात; पण काही साहित्यकृती या समाजव्यवस्थेचे दर्शन घडवतात. वास्तवाची जाणीव करून देतात. लेखक गोपाळ गोसावी लिखित ‘माय’ ही एकांकिका गरिबीने पिचलेल्या, आर्थिक परिस्थितीने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची करुण कहाणी आहे. गोपाळ गोसावी यांनी धारावीत वास्तव्यास असताना म्हणजेच 30 वर्षांपूर्वी ही एकांकिका लिहिली. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचे सादरीकरणही झाले. या 30 वर्षांनंतर ही एकांकिका पुस्तकरूपात अवतीर्ण झाली आहे.

‘माय’ ही एकांकिका फुटपाथवासीयांच्या जीवनावर आधारित आहे. ही एकांकिका फक्त एका कुटुंबाची नाही, तर फुटपाथवर राहणाऱया गरीब, पददलित, उपेक्षितांची, ज्यांची नागरिक म्हणून काही नोंदच नाही अशांची ही गोष्ट आहे. या एकांकिकेत यशोदा म्हणजेच माय, सखाराम, दिगू, रामू, मुक्या, बाय ही अपत्ये, नारायण हा शेजारी आणि डॉक्टर ही पात्रे आहेत. एकांकिकेतील पात्रांचे संवाद हे ग्रामीण बोलीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वेदना प्रभावीपणे लेखनात उतरतात. एकूण सहा दृश्यांतून कमी अवकाशात ही एकांकिका उत्तम परिणामकारकता साधते. ‘माय’ हे पात्र केंद्रस्थानी असून त्याभोवती कथानक फिरत राहते. सखाराम हा व्यसनाच्या गर्तेत अडकलेला, यशोदा दुसऱयाच्या घरची कामे करून घराला हातभार लावणारी कष्टाळू स्त्र्ााr. या अशा परिस्थितीमुळे हतबल झालेली माय आपल्याला या एकांकिकेत दिसते. पैशांअभावी घरात खायला अन्न नाही म्हणून रामूला भुकेवरून मारहाण करणारी माय पाहिली की, तिची अगतिकता, तिच्या वेदना, त्यामागील तिची भावना दिसून येते.

बेरोजगारीमुळे व्यसनाधीन झालेला सखाराम मायला सतत मारहाण करतो. मुलांना रस्त्यावर भीक मागायला लावून त्यातून आलेले पैसे व्यसनात उडवतो. व्यसनापायी फक्त एका माणसाचं नुकसान होत नाही, तर संपूर्ण कुटुंब त्यात भरडले जाते याचं विदारक चित्रण यात दिसून येते. बायच्या आजारपणासाठी चोरी करून औषध आणणारा रामू पाहिला की जाणवतं, परिस्थिती माणसाला कोणत्या थराला जाण्यास भाग पाडते.

आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. औद्योगिकीकरण वाढत आहे. शहरांचं रूपही पालटत आहे, पण गरीब-श्रीमंत यांतील दरी वाढतच आहे. देशात व्यसनाधीनता, दारिद्रय़, बेरोजगारी, कुपोषण, भ्रष्टाचार, अशिक्षितपणा या समस्या आहेत. एकीकडे सुखवस्तू कुटुंबे आहेत आणि दुसरीकडे रस्त्यावर राहणारी, भीक मागणारी गरीब कुटुंबे आहेत, ज्यांना स्वतःचं घर नाही, जागा मिळेल तिथे राहायचे नंतरच स्थलांतर करायचे, एकवेळचं जेवण मिळत नाही, पुरेसे कपडे अंगावर नाहीत, भीक मागायची अशा पद्धतीचं आयुष्य जगणारी माणसं आहेत. ही गरीब -श्रीमंत दरी वाढतच जात आहे. यातली दरी कमी करणं गरजेचे आहे हा वेगळा दृष्टिकोन या एकांकिकेतून लेखकाने मांडला आहे.

गरिबी, दारिदय़ आणि पोटाची भूक माणसाला वाईट मार्गाकडे वळण्यास प्रवृत्त करते हे आपण पाहिलेले आहे. ही जगण्यासाठी चाललेली चढाओढ सखारामला कशी शहाणपण शिकवून जाते, हे जाणून घेण्यासाठी ही एकांकिका आवर्जून वाचली पाहिजे. पुस्तकाला ज्येष्ठ लेखिका, कवयित्री माधुरी वैद्य यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. समाजातील भीषण समस्या, इतका ज्वलंत विषय एकांकिकेच्या आकृतिबंधातून मांडून पुस्तकरूपात वाचकांपर्यंत पोहोचल्याबद्दल लेखक आणि प्रकाशकांचे आभार!

माय – एकांकिका
लेखक : गोपाळ गोसावी
प्रकाशक : शारदा प्रकाशन
मूल्य : रुपये 50/-