अभिप्राय : जनमानसातील हीरो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

गुप्तहेर, थरारक पलायन कथा, साहसी कथा वाचायला कुणाला नाही आवडणार? परंतु या कथा क्वचितच खऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावर बेतलेल्या असतात. मात्र जगात काही अवलिये होऊन गेले आहेत की, ते कल्पनेतील नायकापेक्षाही भन्नाट आहेत.

ऊ.ं.लॉरेन्स ऊर्फ लॉरेन्स ऑफ अरेबिया नावाने प्रसिद्ध असणारा माणूस खरंच एक कलंदर व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्याभोवती जिवंतपणीच अनेक दंतकथा घेऊन वावरणारा आणि तरीही प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून जगणारा अवलिया म्हणजेच ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’. जन्माने ब्रिटिश असला तरी आयुष्यभर तो अरबांच्या स्वातंत्र्यलढय़ासाठी झगडत राहिला. पहिल्या महायुद्धाआधी जॉर्डन, सिरिया, सौदी अरेबिया, इराक, लेबनॉन, पॅलेस्टाईन हे देश तसे अस्तित्वातच नव्हते. हा सर्व अरबी प्रदेश ऍटोमन तुर्कांच्या ताब्यात होता. लवकरच तुर्कांबरोबरचा जर्मनांचा वाढता दोस्ताना हा ब्रिटिशांसाठी धोकादायक ठरू शकण्याची चिन्हे दिसू लागली. इजिप्तजवळचा सुवेझ कालवा तयार केल्यानंतर त्यावर ब्रिटिशांनी आपले नियंत्रण ठेवले. कारण या कालव्यामुळे त्यांचे हिंदुस्थान व इतर वसाहतींशी व्यापार आणि इतर दळणवळण ठेवणे सोपे जाणार होते.

याला शह देण्यासाठी जर्मनांनी बर्लिन ते काँन्स्टेन्टिनोपल म्हणजे आजचे इस्तंबुल या तुर्कांच्या राजधानीपर्यंत रेल्वे उभारणींचं काम हाती घेतलं. या प्रकल्पाचा पुढचा टप्पा जर अफगाणिस्थान असता तर ब्रिटिशांचं साम्रज्य धोक्यात येणार होतं. अशातच पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि तुर्कस्थान जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरला. तुर्कस्थानला धडा शिकवण्यासाठी त्यांचा अवाढव्य पसरलेल्या साम्राज्याला सुरुंग लावणं गरजेचं होतं. त्यासाठी अरब बंडोखोरांना हवा देण्याचं काम ब्रिटिशांनी गुप्तहेर असणाऱ्या लॉरेन्सवर सोपवलं. ब्रिटिशांनी लॉरेन्सला याआधी एक पुरातत्त्व संशोधक म्हणून अरेबियात धाडलं. पहिल्या अरेबिया भेटीत लॉरेन्सने अरेबिया शेकडो मैल पायी फिरून अरबांचा अभ्यास केला. त्याने अरबी पोषाखात राहून भटकंती करून भाषा, अरबी रीतिरिवाज शिकून घेतले.

तुर्कांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या अरबांना त्याने अरब राष्ट्राचं स्वप्न दाखवलं. तुर्कांशी गनिमीकाव्याने चकमकी घडवून अचानक वाळवंटात गायब होण्याची छापामार युद्ध पद्धत तयार करून या भटक्या अरबांच्या मदतीने लॉरेन्सने तुर्कांचे रेल्वे, पूल, महत्त्वाची ठाणी उद्ध्वस्त करत त्यांना सळो की पळो करून सोडलं.

पहिल्या महायुद्धात तुर्कांच्या पराभवानंतर तयार झालेल्या अरब राष्ट्रांचा एका अर्थाने लॉरेन्स हाच जनकच होता. पहिल्या महायुद्धानंतर लॉरेन्स हा युरोपात जनमानसात एक हीरोच झाला. काही काळ त्याने ब्रिटिश हिंदुस्थानातील मिरानशहा या तळावर घालवला. हिंदुस्थानी लोकांच्या पराभूत आणि स्वाभिमानशून्य स्वभावाबद्दल त्याने आपल्या नोंदीत लिहलं आहे.

इंग्लंडमधे अवघ्या 45 व्या वर्षी त्याचा एका मोटार अपघातात मृत्यू झाला. त्याच्या हयातीतच इंग्लंडमध्ये त्याच्यावर त्याचे पराक्रम सांगणारी अनेक नाटके, पुस्तके प्रकाशित झाली. त्याच्या मृत्यूआधी त्याच्यावर होणाऱ्या चित्रपटाचेही काम सुरू झाले होते. अनेक दंतकथा सोबत घेऊन वावरणारा अरबांच्या मायभूमी लढणाऱ्या लॉरेन्सला लॉरेन्स ऑफ अरेबिया हेच नाव शोभून दिसतं.

लॉरेन्स ऑफ अरेबिया
लेखक : यशवंत रांजणकर
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन
मूल्य ः रुपये 300/-