
सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळ्या विषयांवर रील्स बनवनू स्टार झाले आहेत. हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हिडीओ लाईव्ह स्ट्रीम करतात. मात्र, लाईव्ह स्ट्रीमदरम्यान एका महिला सोशल इन्फ्लुएन्सरच्या स्ट्रीमिंग अॅपचा ब्यूटी फिल्टर अगदी काही सेकंदांसाठी बंद झाला आणि तिचा खरा चेहरा जगासमोर आला. या प्रकारामुळे तिचे दीड लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स एका दिवसात कमी झाले. चीनमधील ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ @ClownWorld या ‘एक्स’ हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ही महिला स्ट्रीमिंग सुरू असताना अतिशय सुरेख दिसत होती. त्यात तिचा चेहरा पांढरा, मोठे डोळे आणि शार्प जॉ लाईन दिसत होती. फिल्टर बंद पडले आणि तिचा नैसर्गिक खरा चेहरा समोर आला. तो पूर्णपणे वेगळा होता. अनेकांनी हा प्रकार म्हणजे फसवणूक असल्याचे म्हणत तिला अनफॉलो केले.































































