
आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करत असताना एका महिला सफाई कर्मचाऱ्याला पालिकेच्याच बसने चिरडल्याची धक्कादायक घटना आज घडली. आशा सहाने (४८) असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला.
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान हे मंगळवारी पालिकेत दौऱ्यावर आले होते. यावेळी आपल्या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी विविध संघटनांच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करत कामगारांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. तणाव वाढू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी आंदोलकांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखून धरले. याच गोंधळात, काशिमीरा परिसरात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी आशा सहाने या प्रवेशद्वाराबाहेर उभ्या असताना तेथून जाणाऱ्या परिवहन सेवेच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली.
काही अंतर फरफटत नेले
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार बसचे चाक आशा यांच्या पायावरून गेल्याने त्या बससोबत काही अंतर फरफटत गेल्या. या भीषण अपघातात त्यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आंदोलक कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना तातडीने मीरा रोड येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




























































