
ज्येष्ठ समाजसेविका विद्या बाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 84 वर्षाच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विद्या बाळ यांचा जन्म 12 जानेवारी, 1937 मध्ये झाला. त्यांनी 1958 साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली होती. महाराष्ट्रामधील व हिंदुस्थानातील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. लेखिका, संपादक आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती.
विद्या बाळ यांनी दोन वर्षे पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. त्यानंतर, 1964 ते 1983 या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक पदावर त्या कार्यरत होत्या. पुढे 1983 ते 1986 या काळात त्यांनी मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्या स्त्री मासिकातून बाहेर पडल्या आणि ऑगस्ट 1989 मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक त्यांनी सुरू केले. या मासिकाच्या त्या संस्थापक-संपादक होत्या. मासिकात पहिल्या 20 वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक 45 लेखांच्या संग्रहाचे ’स्त्रीमिती’ नावाचे पुस्तक 2012 साली प्रसिद्ध करण्यात आले होते.
स्त्रियांच्या समस्यांबाबत विद्या बाळ यांना विशेष आस्था आहे. 1981 साली त्यांनी ’नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते.
विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रूपांतरित कादंबरी लिहिली आहे. त्यांच्या लेखणीतून अनेक स्फुट लेख उतरले आहेत.
विद्या बाळ यांचे सामाजिक कार्य
1982 साली दोन स्त्रियांचे खून झाले होते. त्या वेळी विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले होतं. या प्रदर्शनाने अख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला होता.
स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी. म्हणून मग विद्या बाळ यांच्या संघटनेने ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पण समाजात केवळ स्त्रियांचीच कुचंबणा होते असे नाही तर अनेकदा पुरुषांनाही अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यांना बोलण्यासाठी, आपली व्यथा मांडण्यासाठी हक्काची जागा मिळावी हे समजून विद्या बाळ यांनी 2008 साली ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले.
बलात्कारित पीडितेला बलात्कारानंतर मिळालेला पती, कुटुंब आणि गावचा पाठिंबा हे एक समाजासाठी उदाहरण होते. त्यामुळे संघटनेने संबंधितांचा केलेला सत्कार, रात्रीच्या काळोखात अन्याय-अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रात्रीच हातात टॉर्च घेऊन जनजागृतीसाठी काढलेली ‘प्रकाशफेरी’, सुशिक्षितांमध्येही अन्याय वाढत होते, म्हणून सुशिक्षितांसाठीही पथनाटय, वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येविरोधात निदर्शनं-मोर्चा-परिसंवाद, एकटया स्त्रियांसाठी परिषद, विवाह परिषद, ग्रामीण-शहरी स्त्रियांची एकत्र परिषद, युनोने फॅमिली इयर जाहीर केले तेव्हा कौटुंबिक समस्या मांडण्यासाठी कुटुंब नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद, अॅसिड हल्ल्यांविरोधात जागृतीसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’, असे अनेक कार्यक्रम विद्या बाळ यांच्या ‘नारी समता मंच’ने केले.
याशिवाय, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्याजणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या गोष्टींद्वारे संस्था लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न त्यांनी केले. महिला मंडळांना सामील करून घेण्यासाठी ‘सखी साऱ्याजणी’च्या आज गावोगावी शाखा आहेत.
साहित्य आणि समाजिक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. आगरकर पत्रकारिता पुरस्कार, कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार, कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’, स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.




























































