श्रावण मासि हर्ष मानसी

1172

सामना ऑनलाईन | मुंबई

आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि हिंदुस्थानी सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले.
श्रावण महिना म्हटला की एक-एका सणाला सुरुवात होते. घराघरात एक प्रकारचे धार्मिक वातावरण असते. श्रावण महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे तथा पोथी पुराणांचे वाचन करुन श्रावण महिन्यातील व्रतांची माहिती मिळवली जाते. श्रावण महिन्यात रविवारी सूर्यनारायणाची पुजा, श्रावणी सोमवार,  मंगळागौर,  नारळी पौर्णिमा,  रक्षाबंधन, जन्माष्टमी,  बैलपोळा हे महत्वाचे सण आहेत.
नागपंचमी
हिंदुस्थानात नाग-साप यांना देव मानले जाते. नागाची पुजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली. या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता. श्री कृष्णाने कालिया नागाचे दमन केले व या दिवशी कृष्ण नागासह डोहातून वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली अशी कथा सांगितली जाते.

नागदेवता प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही या मागची भावना असते. गावच्या ठिकाणी अंगणात ठिपक्यांच्या रांगोळीचे नाग काढतात. तसेच पाटावर चंदनाने पाच फणांचा नाग काढुन त्याची पुजा करतात. नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिध्द मानले आहे कारण या क्रिया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोहतण्याची शक्यता असते असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया फुगडी, झिम्मा, फेर असे निरनिराळे खेळ खेळतात.nagpanchami

नारळी पोर्णिमा / राखी पोर्णिमा
समुद्राकाठी राहणाऱ्या प्रामुख्याने कोळी बांधवांचा हा सण. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाज वगैरेची ये-जा या काळात बंद असते.  जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा या दृष्टीने लोक जलदेवतेची पुजा करतात. पुजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करताना तांब्याची नाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासुन कोळी बांधव आपल्या होड्या घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात. हाच दिवस राखीपौर्णिमा म्हणुनही देखील साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. भावाने आपले रक्षण करावे असा हेतू राखी बांधण्यामागे असतो. या दिवशीचे मुख्य पक्वान म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या /खोबऱ्याच्या वड्या, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करुन हा सण साजरा करतात.

r-n

गोकुळाष्टमी
श्री कृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरीता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी.  ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्वजण या दिवशी उपवास करतात. रात्री बारा वाजता श्री कृष्णाचा जन्म साजरा करातात. काल्याचे कीर्तन करतात आणि प्रसाद म्हणुन सुंठवडा वाटतात. दुसऱ्या दिवशी पारणे करतात. सार्वजनिक ठिकाणी दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम असतो. दहीहंडी म्हणजे मातीच्या मडक्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही, साखर यांसारखे पदार्थ कालून घेतात व 20-25 फुट उंचावर बांधुन ठेवतात व मानवीमनोरे रचुन ही हंडी फोडतात.handi

बैलपोळा
श्रावण वद्य अमावस्येला बैलपोळा असे म्हणतात. हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. शेतीसाठी बैलाची मदत घेतली जाते. त्यांच्या कष्टामुळे आपल्याला धनधान्य मिळते म्हणुन त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांनी केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. दक्षिण महाराष्ट्रात या सणाला बेंदूर म्हणतात. या दिवशी शेतकरी बैलांना आंघोळ घालून सजवतात, शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झुल घालुन सजवतात. त्या दिवशी बैलांना पुर्ण दिवस विश्रांती देतात. घरात बैल नसल्यास मातीचा बैल बनवून त्याची पूजा केली जाते. त्या सांयकाळी त्यांची पुजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात.

bailpola

मंगळागौर

सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदाय़ी मंगळागौरी या देवतेचे एक व्रत . या व्रताला शिव आणि गणपतीसह गौरीची पुजा करतात . लग्नानंतर पहिली पाच ते सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन करतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्रीसाठी पोळी, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, ला़डू वगैरे फराळाचे जिन्नस करतात. रात्री मंगळागौरीची आरती करतात. रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाणे, फुगड्या, झिम्मा असे खेळ खेळतात. सकाळी उठल्यावर आंघोळ करुन दही भाताचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर मंगळागौरीवर अक्षता टाकतात. यानंतर विहीर, तळे, नदी यापैकी कोठेही पाण्यात तिचे विर्सजन करतात.

mangla

 

आपली प्रतिक्रिया द्या