वसईत स्कायवॉकखालील फायबर शीट्स तुटून खाली पडल्या, सुदैवाने दुर्घटना टळली

वसई पश्चिमेला वर्तक कॉलेजसमोरील रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसविलेल्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.

स्कायवॉकच्या खालील बाजूस फायबरच्या शिट बसविण्यात आल्या होत्या. बुधवारी अचानकपणे वसईच्या वर्तक महाविद्यालयाच्या गेट समोरच असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूच्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून लोंबकळत असलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या फायबर शिट काढून टाकण्यात आल्या.

रेल्वे स्थानकाला लागूनच हा परिसर असल्याने येथून प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची ये-जा सुरू असते. मात्र घटना घडली तेव्हा कोणीही स्कायवॉक खाली नसल्याने अनर्थ टळला आहे.