
सामना ऑनलाईन, कझान
फिफा वर्ल्डकपमध्ये संभाव्य जेतेपदाच्या शर्यतीतील बलाढय़ ब्राझील आणि चिवट बेल्जियम यांच्यात ६ जुलैला मध्यरात्री ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. ब्राझीलचे आक्रमण विरुद्ध बेल्जियमचा प्रतिकार असे युद्ध पाहण्यासाठी फुटबॉलशौकिनांची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. पाच वेळचा जगज्जेता ब्राझील सहाव्या जेतेपदाच्या दिशेने कूच करणार की बेल्जियम विजयासह वर्ल्ड कपमध्ये नवा अध्याय लिहिणार याकडे तमाम फुटबॉलप्रेमींचे लक्ष असेल.
झुंजार खेळ
बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबर्टे मार्टिनेझ हे बाद फेरीतील विजयानंतर भरभरून बोलत आहे. ते म्हणाले, आमच्या खेळाडूंसाठी हे स्वप्नवत आहे. ब्राझीलवर दबाव टाकण्यासाठी आम्हाला आमचा बचाव भक्कम करावा लागेल आणि त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. इडन हेजार्ड, केव्हीन डि ब्रूइने आणि रोमेलू लुकाकू यांसारखे स्टार खेळाडू मोठे उलटफेर करण्याची क्षमता बाळगून आहे.
फ्रान्स-उरुग्वेमध्ये तुल्यबळ लढत
फिफा वर्ल्ड कपमध्ये होणाऱया पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत फ्रान्स आणि उरुग्वे यांच्यामध्ये तुल्यबळ लढतीची अपेक्षा आहे. इतिहासाच्या आकडेवारीकर नजर टाकल्यास उरुग्वेचे पारडे जड दिसत असले तरी फ्रान्समध्ये कुठल्याही संघाला पराभूत करण्याची नक्कीच क्षमता आहे हे कोणी नाकारणार नाही.
अभेद्य कॉल
जर्मनीला पराभूत करणाऱया मेक्सिकोला २-० गोलने धूळ चारून ब्राझीलने आपली ताकद दाखवून दिली. या सामन्यात स्टार खेळाडू नेमारच्या शानदार कामगिरीने तो दुखापतीतून सावरल्याचे सिद्ध झाले. दुसरे म्हणजे ब्राझीलने गटफेरीतील तीन लढतींत केवळ एक गोल स्वीकारला आहे. त्यामुळे बेल्जियमसमोर ब्राझीलच्या आक्रमणाबरोबरच त्याच्या बचावफळीला भगदाड पाडण्याचेही आव्हान असेल. दुसरे म्हणजे नेमार, कॉटिन्हो, जीसस, पॉलिन्हो असा स्टार खेळाडूंचा भरणा ब्राझील संघात आहे.
आजच्या लढती
- उरुग्वे वि. फ्रान्स, निझनी गोवगोरोड (रात्री ७.3० वा.)
- ब्राझील वि. बेल्जियम, कझान (रात्री ११.3० वा.)



























































