फीफा वर्ल्ड कपलाही कोरोनाचा अडथळा, मैदान तयार करणाऱया पाच कर्मचाऱयांना कोरोनाची लागण

631

कोरोना विषाणुमुळे अवघे जग ठप्प झाल्याने सहाजिकचं क्रीडा विश्वालाही याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. ऑलिम्पिक, आईपीएलसह अनेक क्रीडा स्पर्धा कोरोनाच्या धसक्यामुळे रद्द झाल्या आहेत. मात्र, आता फीफा वर्ल्ड कपसाठीही हा विषाणू अडथळा ठरत आहे. कतार येथे आयोजित करण्यात येणाऱया स्पर्धेसाठीच्या स्टेडियमच्या उभारणीत व्यस्त असलेल्या पाच कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कतारमध्ये 2022मध्ये फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. क्रीडाविश्वातील या सर्वात लोकप्रिय स्पर्धेसाठी सात स्टेडियम तयार केले जात आहेत. मात्र, वेगवेगळया तीन स्टेडियममध्ये काम करत असलेल्या पाच कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फीफा वर्ल्ड कपशी संबंधित कोरोनाचे हे पहिलेचं प्रकरण होय. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीला कोरोनाचा अडथळा यायला सुरुवात झाली आहे. अल थुमामा स्टेडियमचा कॉण्ट्रेक्टर म्हणून काम करत असलेल्या दोन स्टाफला कोरोनाची लागण झाली. अल रायन स्टेडियमवर काम करणाऱया एकाला, तर अल बायत स्टेडियमवरील दोघा कर्मचाऱयांनाही या प्राणघातक विषाणूने विळखा घातला आहे. त्यामुळे आता फीफा वर्ल्ड कपच्या तयारीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. सात पैकी एक स्टेडियम तयार झाले असून, सहा स्टेडियमची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र, आता कोरोनामुळे मैदानाच्या कामाच्या वेगावर परिणाम होणार आहे.

रुगानी, मतुदी यांनी कोरोनाला हरवले
इटलीतील युवेंट्स फुटबॉल क्लबच्या डेनिले रुगानी व ब्लेज मतूदी या स्टार खेळाडूंनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. या दोघांचीही तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, सध्या हे दोघे खेळाडू सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. सिरी-ए फुटबॉल लीगमध्ये रुगानी हा कोरोना झालेला पहिला खेळाडू होता. त्यानंतर या लीगमधील 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या