
एका बाजूला आशियाई फुटबॉलचा झपाट्याने उंचावणारा चेहरा म्हणजे सौदी अरब आणि दुसऱ्या बाजूला दोन वेळचा विश्वविजेता आणि फुटबॉलच्या परंपरेचा अभिमानी वारसदार उरुग्वे. हा वाळवंटातला वेगवान आणि लॅटिन अमेरिकन जादुई संघ यांच्यातील लढत जोरदार होणार, यात वाद नाही.
सौदी अरबने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या संघातील सालेम अल-दावसरी, फिरास अल-ब्रिकान आणि मोहम्मद कन्नो हे खेळाडू कोणत्याही बचावफळीला हादरे देऊ शकतात. वेगवान काऊंटर अटॅक आणि शिस्तबद्ध बचाव ही त्यांची ताकद आहे. घरच्या लीगमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढला आहे. मात्र उरुग्वे म्हणजे अनुभव, परंपरा आणि गुणवत्ता यांचा संगम. फेडेरिको वाल्वेर्दे, डार्विन नुनेझ, रोनाल्ड अराउजो यांसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू त्यांच्या ताफ्यात आहेत. मध्यफळीत वाल्वेर्देचा वेग आणि नुनेझची आक्रमकता सामना एका क्षणात फिरवू शकते.
स्पेनसमोर काबो व्हर्डेची परीक्षा
स्पेन आणि नवखा काबो व्हर्डे यांच्यातील सामना हा अनुभव आणि उत्साह यांच्यातील संघर्ष ठरणार आहे. स्पेनकडे चेंडूवरील नियंत्रण, अचूक पासिंग आणि सामन्यावर पकड ठेवण्याची कला आहे. पेड्री, गावी, निको विल्यम्स आणि रॉड्री यांच्या नेतृत्वाखाली स्पेनचा संघ पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, काबो व्हर्डेसाठी हा सामना इतिहास घडवण्याची संधी आहे. आफ्रिकन फुटबॉलचा नवा चेहरा म्हणून ते मैदानात उतरतील. त्यांच्याकडे अनुभव कमी असला तरी वेग, निर्भय खेळ ही त्यांची जमेची बाजू आहे. स्पेनचा ताबा आणि काबो व्हर्डेची झुंज यामध्ये रंगेल.
युद्धाच्या सावटाखाली इराण-न्यूझीलंडची टक्कर
दिवसातील सर्वाधिक भावनिक आणि चर्चेतील सामना म्हणजे इराण आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत. मैदानाबाहेरील युद्धसदृश घडामोडींमुळे या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इराणचा संघ तांत्रिकदृष्ट्या मजबूत आणि अत्यंत शिस्तबद्ध मानला जातो. मेहदी तारेमी, सर्दार अझमून आणि अलिरेझा जहानबख्श यांच्यावर आक्रमणाची जबाबदारी असेल. आशियातील अव्वल संघांपैकी एक असलेल्या इराणची ताकद म्हणजे त्यांची संघभावना आणि कठोर बचाव.
न्यूझीलंडकडे जागतिक दर्जाचे मोठे स्टार नसले तरी संघटित फुटबॉल हे त्यांचे प्रमुख शस्त्र आहे. क्रिस वुड हा त्यांचा सर्वात मोठा धोका आहे. सेट पीस आणि हवाई चेंडूंमध्ये न्यूझीलंड नेहमीच धोकादायक ठरतो. इराण अनुभव आणि गुणवत्तेच्या जोरावर किंचित पुढे दिसत असला तरी न्यूझीलंडची जिद्द आणि शिस्त त्यांना सहज शरण जाणार नाही. विश्वचषकातील पहिला सामना म्हणजे दबाव, अपेक्षा आणि संधी यांचा संगम. त्यामुळे या चारही लढतींमध्ये विजयाने सुरुवात आणि बाद फेरीच्या दिशेने पहिले दमदार पाऊल, हेच एकमेव ध्येय सर्व संघाचे असेल.
























































