राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी येथे राष्ट्रवादीच्या दोन गटात हाणामारी झाली असून या घटनेत नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार झाल्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी आणि सचिन सौदाई यांच्या गटात ही हाणामारी झाली आहे. या प्रकारानंतर दोन्ही गटांनी पोलिसांत एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.

पिंपरी येथील सलोनी हॉटेल येथे ही घटना घडली. सचिन सौदाई यांचा वाढदिवस असल्याने वासवानी यांच्या मालकीच्या असलेल्या सलोनी हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काही कारणास्तव सचिन सौदाई यांच्यासमवेत आलेल्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा गोंधळ थांबवण्यासाठी स्वतः डब्बू आसवानी हॉटेलवर गेले. मात्र, हा वाद न थांबता अजून चिघळला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं. या राड्यामध्ये दोन्ही गटाचे चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आसवानी आणि सौदाई या दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आसवानी यांच्या फिर्यादीत सौदाईंच्या गटाने जबरदस्तीने दारू मागवली आणि ती न दिल्यामुळे गोंधळ घातला असं म्हटलं आहे. तसंच या घटनेत डब्बू यांचा मुलगा आशिष याच्यावर कोयत्याने वार केल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी हिरानंद उर्फ डब्बू आसवानी (49, रा.पिंपरी) यांच्या फिर्यादीनुसार सचिन राकेश सौदाई (32), सनी राकेश सौदाई (28), सुनील मुकेश शर्मा (22, रा. सर्व पिंपरी), अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू व इतर 5 ते 7जणांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, दरोडा टाकणे, खुनी हल्ला करणे, धमकी देणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे, सचिन सौदाई (33, रा. पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डब्बू आसवानी यांनी मागील निवडणुकीत मदत न केल्याचा राग मनात धरून जातीयवाचक शिवीगाळ केली. तसंच बेकायदेशीर जमाव जमवून वाद घातला. तसेच सिमेंट गट्टू, लाथा बुक्याने तसेच काचेच्या बॉटलने मारहाण करून जखमी केले, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार नगरसेवक डब्बू आसवानी, लखु भोजवनी, जीजू, आशिष आसवानी, डब्बू आसवानी यांचा दुसरा मुलगा, सनी सुखेचा, लखन सुखेचा, भरत आसवानी यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, जातीयवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.