मुंबईचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी डी. जे. कुलकर्णी यांचे निधन

634

मुंबईचे अग्निशमन दल उभे करण्यात मोलाची कामगिरी बजावणारे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी डी. जे. कुलकर्णी यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. अग्निसुरक्षेच्या क्षेत्रातील तज्ञ असलेले डी. जे. कुलकर्णी झुंजार आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून अग्निशमन दलात प्रसिद्ध होते.

भोपाळ येथे शनिवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातकंडे असा मोठा परिवार आहे. उद्या सोमवारी सकाळी संभाजीनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फायर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच मुंबई अग्निशमन दलात 1960 साली फायर ऑफिसर म्हणून प्रवेश करणारे दुर्गादास जगन्नाथ कुलकर्णी 1997 मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. अग्निशमन दलातील एक निष्णात, धडाकेबाज आणि लढवय्या अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. 37 वर्षांच्या सेवाकाळात मुंबईतील अनेक अग्निकांडे शमवण्यात त्यांनी धाडसी कामगिरी बजावली. आग शमवण्यासाठी वरिष्ठ म्हणून जवानांना केवळ आदेश न देता स्वतः आगीच्या लोळांत शिरून ते मोहिमांचे नेतृत्व करत. अशाच एका मोहिमेत त्यांना आपला एक डोळाही गमवावा लागला.

ब्रिटनच्या साऊथ वेल्स येथे अग्निशमन अभियांत्रिकीचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डी. जे. कुलकर्णी यांचा मुंबईचे अग्निशमन दल सक्षम करण्यात मोठा वाटा होता. फायर सेफ्टी, फायर प्रिव्हेन्शन आणि आपत्ती व्यवस्थापनातील जाणकार तज्ज्ञ असलेल्या डी. जे. कुलकर्णी यांनीच देशभरातील अग्निशमन सुरक्षा आणि सेवांची अभ्यासपूर्ण नियमावली तयार केली. तीच नियमावली आज देशभरात वापरली जाते. 1997 साली मुंबई महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर एअर इंडियामध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांनी विमानतळावरील अग्निसुरक्षेची जबाबदारी पार पाडली. याशिवाय पोर्ट ट्रस्ट, सिडको आदी संस्थांसाठीही कन्सल्टंट आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. अग्निशमन दलातील उत्कृष्ट आणि अतुलनीय सेवेबद्दल 2 आणि 3 शौर्य सन्मान अशी पाच राष्ट्रपती पदके प्राप्त करणारे डी. जे. कुलकर्णी  हे अग्निशमन दलातील बहुधा एकमेव अधिकारी होते. त्यांच्या निधनाने आगप्रतिबंधक उपाययोजना, अग्निशमनातील आधुनिक उपायपद्धती आणि आपत्ती व्यवस्थापनाचा चालता बोलता विश्वकोशच हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या