पूजा सिंघलसोबत अमित शहांचा तो फोटो शेअर करणं पडलं महागात, चित्रपट निर्माते अविनाश दास यांच्यावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amith-shah-avinash-das

अटकेत असलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो शेअर केल्याबद्दल अहमदाबाद शहर गुन्हे शाखेने चित्रपट निर्माते अविनाश दास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की हा फोटो पाच वर्षांपूर्वी काढला होता आणि चित्रपट निर्मात्याने तो आता अमित शहा यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केला आहे. तिरंगा परिधान केलेल्या महिलेचे छायाचित्र शेअर करून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी दास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या अधिकार्‍यांच्या मते, चित्रपट निर्माते दास यांनी 8 मे रोजी अटक केलेल्या झारखंड केडरच्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्या सोबतच्या शहाचा यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि एका कॅप्शनसह आरोप केला की तो IAS अधिकाऱ्याच्या अटकेपूर्वी काढण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘अमित शाह यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे केले गेले आहे. अमित शाह यांची प्रतिमा खराब करण्याचा हा हेतू आहे. दास यांनी त्यांच्या फेसबुकवर तिरंगा परिधान केलेल्या महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्र देखील शेअर केले आहे. हा फोटो हा आपल्या तिरंग्याचा अपमान आहे.’

दास यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दास यांना चौकशीसाठी गुन्हे शाखेत बोलावले जाण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने आयएएस अधिकारी पूजा सिंघलला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. अधिकाऱ्यांनी तिच्या घरातून रोख रक्कम जप्त केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.