
दादर येथील अमर क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित किशोर गट कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात गुड मार्निंग स्पोर्ट्स क्लबने लालबागच्या समर्थ स्पोर्ट्स क्लबवर अवघ्या 5 गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळवत गजानन गोसावी अमर चषकावर आपले नाव कोरले.
दोन्ही संघात अंतिम सामना अत्यंत थरारक झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सामन्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. चढाया आणि पकडींच्या जोरावर दोन्ही संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना कडवी झुंज दिली. मात्र निर्णायक क्षणी गुड मार्ंनग संघाने आपला संयम राखत 51-46 अशा गुणफरकाने जेतेपद पटकावले.
गुड मार्ंनगच्या विजयात पियूष पारडेच्या अष्टपैलू खेळाने मोलाचा वाटा उचलला, तोच सर्वोत्कृष्ट चढाईपटू ठरला तर अंश पांढरेला सर्वोत्कृष्ट रक्षकाचा किताब देण्यात आला. उपविजेत्या समर्थ स्पोर्ट्स क्लबच्या पराभवानंतरही मयंक थोटेने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांची मने जिंकली. तोच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार महेश सावंत, चिरायु नवलकर यांच्या उपस्थितीत पार पडला.























































