वीज मीटरमध्ये छेडछाड करणाऱयांविरोधात थेट गुन्हा दाखल करा, भांडुप परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुप परिमंडळात वीज चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नियमित वीज कनेक्शन असतानाही ग्राहक मीटरमध्ये छेडछाड करून किंवा मीटर बायपास करून वीज वापरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी गंभीर दखल घेतली असून वीज मीटरमध्ये छेडछाड करून कोणी वीज चोरी करत असेल त्याच्यावर आधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून मगच पुढील कायदेशीर कारवाई करा असे निर्देश दिले आहे.

ग्राहक थेट वीज मीटरशी छेडछाड करून, सर्व्हिस केबलला थेट वायर जोडून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा वीज चोरांना अद्दल घडवण्यासाठी वीज अधिकारी आणि कर्मचाऱयांनी वीज चोरी पकडल्यास आधी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी असे निर्देश सुरेश गणेशकर यांनी दिले आहेत. वीज मीटरमध्ये छेडछाड करून होणाऱया वीज चोरीमुळे महावितरणचे मोठे नुकसान होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.