
विजेचा धक्का बसून तरुण खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना नगर शहरातील बुरूडगाव रस्ता परिसरात 31 ऑगस्टला घडली होती. याप्रकरणी या खेळाडूच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्य़ांसह केबल कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य सुरेश गायकवाड (वय 30) असे मृताचे नाव असून, श्री गणेश केबल सर्व्हिसेसचे मालक वनिता अनिल बोरा, पीयूष अनिल बोरा यांच्यासह महावितरणच्या अभियंता आणि कर्मचाऱ्य़ांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
अजिंक्य यांनी थाळीफेक व गोळाफेक खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक मिळविले होते. केंद्र सरकारच्या स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेत ते प्रशिक्षण घेत होते. विजेचा धक्का बसून अजिंक्य यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. महावितरण कंपनीने 28 ऑगस्ट रोजी काम करताना वीजवाहक तारा खाली घेऊन व पुन्हा वर चढविताना तेथे टीव्ही केबल घासून, त्यावरील आवरण निकामी झाल्याने या टीव्ही केबलमध्ये वीजप्रवाह उतरला होता. श्री गणेश केबल सर्व्हिसेसच्या वनिता बोरा या मालक असून, त्यांचा मुलगा पीयूष केबलचे काम पाहतो. त्यांनी केबल विनापरवाना विद्युत तारेवरून टाकल्यामुळे अजिंक्यचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

























































