माजी सरपंच व ग्रामसेवकावर अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

1180

उरण तालुक्यातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या धुतूम ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत निधीचा 54 लाख 41 हजार 492 रूपयांचा गैरवापर आणि भ्रष्टाचार केल्या प्रकरणी धुतूमचे तात्कालीन सरपंच धनाजी महादेव ठाकूर आणि तात्कालीन ग्रामसेवक अजित रामभाऊ केणी यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुतूम गावातील जेष्ठ नागरीक कृष्णा विठ्ठल ठाकूर (82) यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर उरण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 200/2019 भादवि कलम 420, 409, 32 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

धुतूम गावातील तात्कालीन सरपंच धनाजी ठाकूर आणि ग्रामसेवक अजित केणी यांनी 2007 ते 2011 या कालावधीत संगनमत करून धुतूम ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक आरोग्य, खारबंधिस्ती, दिवाबत्ती, ग्रामपंचायत नविन इमारत, आकस्मित (रोषणाई व गुढया उभारणे) व इतर कामामध्ये शासकीय निधीचा गावाच्या विकासासाठी वापर न करता सदर ग्रामनिधीचा अंदाजे 54 लाख 41 हजार 492 रूपयांचा संशयित व 310 रूपयांचा कायम स्वरूपी स्वतःस लाभ करून घेतला असल्याची तक्रार तक्रारदार कृष्णा ठाकूर यांनी दाखल केली होती. तक्रारदार कृष्णा ठाकूर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून हा गुन्हा दाखल करणे पोलिसांना भाग पाडले.

रायगड जिल्ह्याचे तात्कालीन मुख्याधिकारी यांनी 2015 ला याबाबत या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत होता. या प्रकरणात ग्रामसेवक अजित केणी यांना निलंबित देखिल करण्यात आले होते. मात्र त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर अचानकपणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्यातरी कोणालाही अटक करण्यात आले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र 2015 ला कायदेशिर कारवाई करण्याचे तात्कालीन मुख्याधिकाऱ्यांचे आदेश असताना देखिल कारवाईस विलंब का झाला असा सवाल धुतूम ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या