आरे कॉलनीतील जंगलात भीषण अग्नितांडव! वणव्यात दुर्मिळ वनस्पती जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-aarey

सामना प्रतिनिधी । मुंबई

गोरेगावच्या आरे कॉलनीजवळील जंगलात आज सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वणवा भडकल्याने हजारो झाडांसह दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाल्या. अचानक लागलेल्या आगीचे प्रचंड लोळ दूरवरून दिसू लागल्याने परिसरात एकच घबराट निर्माण झाली. आगीमुळे वन्य प्राण्यांची पळापळ उडाली असून या आगीत अनेक प्राण्यांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न केले तरी रात्री 9 वाजता आग आणखीनच भडकत जाऊन ‘लेव्हल-3’ची झाली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

गोरेगाव पूर्व येथे आरे कॉलनी, नागरी निवारा, आयटी पार्क येथील डोंगरावर सायंकाळी आगीची ठिणगी पेटली. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सुकलेले गवत असल्याने ही आग आणखीच भडकत गेली. फायर इंजिन आणि पाण्याच्या जम्बो टँकरने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही प्रचंड धूर आणि आगीच्या मोठय़ा लोळांमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले. दरम्यान, आगीने भडकत जाऊन तब्बल 4 ते 5 कि.मी.चा परिसर व्यापून टाकल्याने रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरूच होते. झाडाझुडपांचे दाट जंगल व वारा असल्याने आगीने डोंगराला वेढले. या वेळी काळ्याकुट्ट धुराचे लोळ पसरल्याने परिसरातील नागरी निवारा परिषद, मंत्री पार्क, संतोष नगर आणि गोकुळधाम आदी वसाहतींमधील लोकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने ही आग वस्तीपासून दूर असल्याने कुणीही जखमी झाले नाही. मात्र या आगीत दुर्मिळ वनसंपत्ती जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी वन सुरक्षा विभाग, स्वयंसेवक तसेच पथके यांचेही मदतकार्य सुरू होते.

आग लावली की लागली

हा वणवाच असावा असा प्राथमिक अंदाज पालिका आणि वन खात्याकडून व्यक्त करण्यात आला असला तरी आग लागली की लावली, असा संशयाचा धूर येत आहे. आरे कॉलनी हा मुंबईतील एकमेव हिरवाई असलेला विभाग असून अन्य उपनगरांच्या तुलनेत या भागात 3 ते 4 टक्क्यांनी तापमान कमी असते. येथील भरगच्च हिरवाईमुळे आरे कॉलनी मुंबईचे फुफ्पूस म्हणून ओळखले जाते. परंतु मुंबईचा विकास आरे कॉलनीपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळे या भागात समाजकंटकांकडून मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. यासंदर्भात येथील पर्यावरणप्रेमींनी अनेक वेळा आवाज उठवला आहे. मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीचीच जागा निवडल्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर झाडांची कत्तल झाली आहे. या कारशेडलाही येथील स्थानिकांचा मोठय़ा प्रमाणावर विरोध आहे. त्यामुळे या आगीतून संशयाचा धूर येत असून ही आग विकासक किंवा समाजकंटकांकडून लावली असावी, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

आदिवासींना सुरक्षित ठिकाणी हलवले

या ठिकाणी राहणाऱया आदिवासींना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली असती तर मोठी हानी झाली असती असे येथील रहिवाशांनी सांगितले. अग्निशमन दलाने 10 बंब, सात जेटी आदीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हाती घेतले. मात्र येथे वाहने जाण्यासाठी जागा नसल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

वन्यजीव वस्त्यांत येण्याची शक्यता

हा संपूर्ण भाग पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असून जंगलातील आगीचे स्वरूप भीषण आहे. या जंगलात बिबटे, हरीण, साप, विविध प्रकारचे पक्षी, दुर्मिळ प्रकारचे कोळी आणि अन्य प्रकारचे कीटक यांचे वास्तव्य या आगीमुळे धोक्यात आल्याची भीती ‘सेव्ह आरे कॉलनी’ संघटनेचे झोरू बथेना यांनी व्यक्त केली. आगीमुळे या जंगलातील बिबटे आणि अन्य वन्य प्राणी नागरी वस्तीकडे येण्याची शक्यता आहे.

आमदार सुनील प्रभू यांची समयसूचकता

आग लागल्याची माहिती मिळताच पंडित शर्मा यांनी विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांना आग म्हाडा उच्च उत्पन्न गटातील बंगलो कॉलनीजवळ येत असल्याची माहिती दिली. यावेळी प्रभू यांनी समयसूचकता दाखवत याठिकाणी आगीचे बंब आणण्यासाठी अग्निशमन दलाला सांगितले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यावेळी नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्यासह मोठया संख्येने शिवसैनिक मदतकार्यासाठी उपस्थित होते.