
राजापूर तालुक्यातील कोतापूर येथील गोंडयाची निवई येथील शेतकरी तुकाराम गोवळकर यांच्या घर व गोठा एकत्रित असलेल्या इमारतीला अचानक आग लागली. आगीत घर जळून भस्मसात झाले आहे. यामध्ये तुकाराम गोवळकर यांचे सुमारे सव्वा दोन लाख रूपये नुकसान झाले आहे. या आगीत इमारतीचे पुर्ण नुकसान झाले असून दोन रेडे व एक पाडा मृत्यूमुखी पडला आहे.
तुकाराम गोवळकर यांनी आपल्या शेतातील काम करून घराकडे गेले होते. मात्र संध्याकाळी घर व गोठा एकत्रित असलेल्या इमारतीला अचानक आग लागली. ही आग विझविण्याचा त्यांच्यासह ग्रामस्थांनी पयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी रेडयांना बांधलेले दावे सोडले, मात्र धुराच्या लोटामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही तरी त्यामधून एक पाडा सुखरूप बाहेर पडला आहे. मात्र या आगीमध्ये औताचे दोन रेडे व एक पाडा मृत्यूमुखी पडला आहे.
गोठा व घर अशी ही इमारत असल्याने जीवनावश्यक वस्तूचा साठा, भांडी वैगरे होती. तीही यामध्ये जळून खाक झाली आहे. त्यामुळे शेतकरी तुकाराम गोवळकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आग प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून सुमारे सव्वा दोन लाख रूपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

























































