
सामना प्रतिनिधी । मुंबई
वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त नगरमध्ये लागलेल्या भीषण आगीत तब्बल 80 झोपड्या खाक झाल्या. सकाळी 11.36च्या सुमारास एका बंद घरात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. यानंतर एकापाठोपाठ एक असे तब्बल सात सिलिंडर स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला.
वांद्रे पश्चिम लालमाती परिसरात ही झोपडपट्टी आहे. ‘म्हाडा’च्या अखत्यारित येणाऱया या जागेवर दोन ते तीन मजल्यांपर्यंत दाटीवाटीने झोपडय़ा बांधण्यात आल्या आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. सकाळी 11.36 वाजता लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 10 पाण्याचे टँकर, 12 फायर इंजिन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र सिलिंडर स्फोटांमुळे आग आणखीनच भडकत गेल्याने परिसरात धुराच्या लोळांचे साम्राज्य पसरून रहिवाशांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाचे 50 कर्मचारी, पोलिसांच्या मदतीने सायंकाळी पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू होते.
संशयाचा धूर
आग लागलेल्या ठिकाणी असलेल्या झोपडय़ांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र झोपडपट्टीवासीयांनी तीन ते चार मजल्यांपर्यंत बांधकामही केले आहे. त्यामुळे ही आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2004 पासून या ठिकाणी सात ते आठ वेळा आग लागली असून गेल्या दीड वर्षातील ही तिसरी आगीची घटना आहे.
लाखोंची वित्तहानी
या आगीत सुमारे 80 झोपडय़ांमधील संसार जळून खाक झाले आहेत. लाखोंची हानी झाल्यामुळे ही सर्व कुटुंबे वाऱयावर आली आहेत. त्यामुळे आम्हाला ‘म्हाडा’कडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी रहिवासी करीत आहेत. दरम्यान, ‘म्हाडा’कडून आगीच्या ठिकाणचा पंचनामा झाल्यानंतरच मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
दोन मुले सुदैवाने बचावली
आग लागल्याच्या प्रसंगी एका बंद घरात दोन मुले होती. अग्निशमन दलाने त्यांना तातडीने बाहेर काढले. मात्र धुरामुळे या मुलांना प्रचंड त्रास झाला. सफिउद्दिन सल्लाउद्दिन रहीम (2 वर्षे) आणि हुमेरा सल्लाउद्दिन रहीम (5 वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत. या आगीत स्वतःचे घर डोळय़ांसमोर जळताना पाहून दोन महिलांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्या अत्यवस्थ झाल्या. या चारही जणांवर वांद्रय़ाच्या भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिलांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.



























































