नगर शहरातील नेहरु मार्केटमध्ये अग्नितांडव; 15 दुकाने खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील भिंगारमध्ये शुक्रवार सदर बाजारातील नेहरू मार्केटमधील दुकानांना रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 15 दुकाने जळून खाक झाली असून, 10 दुकाने आगीपासून वाचविण्यात यश आले आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने भिंगार शहरात एकच खळबळ उडाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आगीची घटना घडल्याचे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सांगितले.

नगर शहरातील भिंगार येथील नेहरू मार्केटमध्ये 25 दुकाने आहेत. यातील बहुतांश दुकाने ही कपडय़ांची आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या दुकानांमध्ये मोठय़ा प्रमाणात माल भरून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आग प्रचंड वेगाने इतर दुकानांमध्येही पसरली. या आगीत 15 दुकाने जळून खाक झाली असून, संबंधित दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच मनपा, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडीई असे चार अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. आगीची दाहकता मोठय़ा प्रमाणात होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आग आटोक्यात आणली.

सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. यात दहा दुकाने वाचली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच्या घटनेचा भिंगार कॅम्प पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

भिंगार कॅम्प पोलिसांची तत्परता
शुक्रवार बाजारमधील नेहरू मार्केटला आग लागण्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क करून राहुरी, मनपा, एमआयडीसी, व्हीआरडीई अशा चार अग्निशमन दलांना पाचारण केले. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत ग्रामस्थांना घरातून बाहेर निघण्याचे संदेश देत शहरातील पेट्रोलिंग मोबाईल तसेच अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेतले. घटनेत 15 दुकाने जळाली असून दहा दुकानांना जळण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी भेट दिली. तोफखाना, कोतवाली, नगर तालुका पोलिसांचे पेट्रोलिंग मोबाईल, आरसीपी घटनास्थळी हजर होते.