साकीनाक्यात गोदामाला, दहिसरमध्ये केबलला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका येथे काल सकाळी गोदामाला तर संध्याकाळी दहिसर येथे इलेक्ट्रिक केबलच्या साठय़ाला आग लागली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

साकीनाका, खाडी क्रमांक -3, येथील सर्वोदय हॉटेलजवळील एका गोदामाला आज सकाळी 8.30 च्या सुमाराला आग लागली. काही क्षणातच बाजूच्या झोपडय़ांनाही आग लागली आणि तिने भीषण रूप धारण केले. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

 9 फायर इंजिन, 1 वॉटर टँकर, 7 जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या आगीवर अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवले गेले. यात गोदामासह काही झोपडय़ा खाक झाल्या. दरम्यान, आगीचे कारण समजले नसून अग्निशमन दल पुढील चौकशी करत आहे. दरम्यान, दहिसर पूर्वमधील आनंदनगर परिसरातील जयानगर मैदानात टाकलेल्या इलेक्ट्रिक केबलच्या साठय़ाला सायंकाळी 4 च्या सुमाराला आग लागली. मात्र अग्निशमन दलाने तासाभरातच आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले.