नोएडाच्या स्पाइस मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची राजधानी नवी दिल्लीच्या जवळील नोएडाच्या स्पाइस मॉलला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

या मॉलच्या वरच्या मजल्याला एक्झिस्ट फॅनमुळे आग लागल्याची माहिती नोएडाचे पोलीस अधीक्षक वैभव कृष्ण यांनी दिली. एअर नियंत्रण युनिटमुळे आगीचा धूर इतर मजल्यांवरही पसरला. त्यामुळे इतर मजल्यांवरही आग पसरली आहे काय, याचा शोध घेण्यात येत असून आगीवर पूर्ण नियंत्रण मिळाल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे. आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट दिसत होते. सोशल मिडीयावर याबाबतचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने परिसरात तणाव होता. मात्र, या आगीत जीवितहानी झाली नसून इमारतीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

मॉलमध्ये वर्दळ असण्याच्या वेळेसच आग लागल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत सर्व नागरिकांना सुखरुप बाहेर काढले आहे. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या मॉलमध्ये मुव्ही थियेटर, फूड कोर्ट, शॉपिंग मॉल तसेच अनेक दुकाने असल्याने या मॉलमध्ये नेहमी वर्दळ असते.