
सामना प्रतिनिधी । वाढवणा
वाढवणा येथे सोमवारी सायंकाळी 6 वाजता डांगेवाडी जवळील शेतातील 4 एकर ऊस शार्टसर्किटमुळे जळून खाक झाला असून त्यात सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आहे.
तीन महिन्यांपासून पाणी बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत होते. तसेच उद्गीर येथील विकास साखर कारखान्याने शेतातील ऊस नेला नसल्याने शेतकऱ्यांचे संकट वाढले होते. त्यातच सोमवारी सायंकाळी 6 वाजता शेतातील विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने उसाच्या शेताला आग लागली. शेताला आग लागल्याची माहिती शेतकऱ्याला कळवण्यात आली. आगीचे वृत्त समजताच गावातून मोटारसायकल घेऊन 25-30 जण शेतात पोहचले. त्यांनी लिंबाच्या झाडाचे फाटे मोडून उसाच्या शेतातील आग आटोक्यात आणली.
शेतकरी पद्मिनबाई रामदास साळुंके, गंगाधर माधवराव पदाजी या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस आगीत भस्मसात झाला आहे. या परिसरात एकूण 9 एकरावर ऊस होता. मात्र, गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याने इतर पाच एकरवरील ऊस जळण्यापासून वाचला आहे. शॉर्ट सर्किटबाबत माहिती देण्यासाठी वीज खात्याचे अधिकारी, लाइनमन, तलाठी आणि कारखान्याला फोन केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आगीची घटना संध्याकाळी घडल्याने घटनास्थळाचा पंचनामा झालेला नाही. मात्र, सुमारे 4 लाखांचे नुकसान झाल्याचे शतेकरी पद्मिनबाई साळुंके व गंगाधर पदाजी यांनी सांगितले.



























































