अग्निशमन दलात आग विझवणारा ड्रोन, समुद्रातील दुर्घटनांप्रसंगीही बचावकार्य करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच आग विझवणारा अत्याधुनिक ड्रोन दाखल होणार आहे. हा ड्रोन आगीच्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती तर देणारच आहे शिवाय पाइपच्या सहाय्याने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवणार आहे. शिवाय समुद्रात बुडणाऱयांना रिंग बॉल, रोप टाकून बचावकार्यासाठी मदत करणार आहे. पालिकेचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी ही माहिती दिली.

मुंबईत घडणाऱया सर्व प्रकारच्या दुर्घटनांमध्ये बचावकार्यात महत्त्वाची भूमिका असणाऱया पालिकेच्या अग्निशमन दलाच्या अद्ययावतीकरण करण्याचे धोरण प्रशासनाने आखले आहे. नवीन प्रकल्पांसाठी यावर्षी विशेष 300 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यातून अग्निशमन दलाच्या जवानांना आणखी सक्षम करण्यासाठी ड्रील टॉवर कम मल्टी युटीलिटी ट्रेनिंग सिम्युलेटर्स बांधले जाणार आहे. या शिवाय आग विझवणे, नियंत्रणासाठी सहाय्य करणे, मिनी फायर स्टेशन, फायर रोबोट, इलेक्ट्रिक वाहने घेण्यात येणार आहेत. केवळ निरीक्षण नाही तर प्रत्यक्ष बचाव कार्यात सहभाग घेऊ शकणाऱया या ड्रोनमुळे बचावकार्यात मोठे सहकार्य होणार असल्याचे परब यांनी सांगितले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अद्ययावतीकणासाठी 65 कोटी 54 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

अशी असणार वैशिष्ट्ये

आग लागलेल्या किंवा दुर्घटनेच्या ठिकाणी जवान प्रत्यक्ष पोहोचू न शकणाऱ्या ठिकाणी माहिती कॅमेऱ्याच्या माध्यमातून कळवू शकणार आहे. दुर्घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दल, प्रशासनाचा मेसेज पोहोचवून धीर देण्याचे काम करणार.

सद्यस्थितीत पालिकेकडे 90 मीटर उंचीची आणि तिसाव्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी आहे. मात्र ड्रोन उत्तुंग मजल्यापर्यंत पोहोचणार आहे. समुद्रात बुडणाऱयाला रिंग बॉल किंवा रोप असे साहित्य काही क्षणात पोहोचवू शकणार आहे.