नांदेडमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, डॉक्टरसह दोन जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

8 एप्रिलच्या रात्री नांदेड शहरात दोन ठिकाणी गोळीबार झाला असून या गोळीबारात दोन जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या माणसाची 15 लाख रुपये किमतीची चार चाकी गाडी मारेकऱ्यांनी चोरून नेली आहे.

सध्याच्या स्थितीत या गाडीचा पत्ता पोलिसांना लागला आहे. पोलीस विभाग त्यावर नजर ठेवून आहे. 8 एप्रिलच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कॉल आला की, दोन माणसांनी चार चाकी गाडीवर फायरिंग करून त्यांना जखमी केले आहे. हा प्रकार विद्यापीठ, विष्णूपुरीजवळ घडला आहे. या संदर्भाची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस कर्मचारी तिकडे रवाना झाले. ते अर्धा रस्त्यातच पोहोचण्यापूर्वी दुसऱ्या फोन कॉलने पुन्हा पोलिसांना माहिती मिळाली की, विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या कार्यालयासमोर एक माणुस जखमी अवस्थेत पडला आहे. राजाभाऊ जाधव व त्यांचे सहकारी तिकडे आले असतांना तेथे एका माणसाच्या उजव्या काखेखाली गोळी लागली होती. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले तेंव्हा तो मरण पावला असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

दुसऱ्या एका घटनेत डॉ. सतिश प्रभाकरराव गायकवाड (रा.डोंगरकडा ता.कळमनुरी) हे आपली आई, बहिण व मुलगा आणि मित्र बशीर पठाण हे सर्व आपल्या कारने अहमदपुर येथून डोंगरकडाकडे जात होते. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या कारच्या पाठीमागून मोटारसायकलवर दोन युवक आले आणि त्यांनी कार अडवली. एका युवकाने कार जवळ येवून डाव्या बाजूच्या काचेतून आतमध्ये पिस्तुलने गोळी झाडली. काच फुटला आणि ती गोळी सतिश गायकवाड यांच्या पाठीवर लागून तिच गोळी गाडी चालक तथा मित्र बशीर पठाण यांच्या डाव्या हाताला लागली. त्या युवकांनी गाडी बाहेर येण्यास धमकावले .सर्व जण गाडीच्या बाहेर आले आणि पाठीमागे जावून पळत सुटले. गोळी झाडणाऱ्या युवकाने गाडी की, चाबी देदो अशी ओरड केली. पण त्यांनी चाबी दिली नाही आणि पळत सध्या निवडणुकीच्या कारणाने सुरू केलेल्या तपासणी पॉईंटवर पोहचले. तेथील लोकांनी त्यांना उपचारार्थ दवाखान्यात पाठवले.

फायरिंग करणारे दोन युवक पुढे आले तेंव्हा त्यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकासमोर कार थांबवून त्यातील शेख नजीब याच्या उजव्या काखेखाली गोळी मारली आणि त्याला बाहेर फेकून 8447 क्रमांकाची कार चोरून नेली. या संदर्भाने पोलीस उपनिरिक्षक राजाभाऊ जाधव यांच्या तक्रारीवरून शेख नजीबचा खून करणाऱ्या आणि डॉ.सतिश गायकवाडला जखमी करणाऱ्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 174/2019 कलम 302,397, 398, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरिक्षक शेख जावेद यांच्याकडे देण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक संजय जाधव , अपर पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, उपअधिक्षक धनंजय पाटील आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अनेक अधिकारी, कर्मचारी रात्रभर जागून आहेत. पोलीसांनी घेतलेल्या मेहनतीला यश येवून पळवून आणलेली 8447 क्रमांकाची कार आता कुठे उभी आहे याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस या गाडीवर लक्ष ठेवून आहेत आणि सोबतच बॉम्ब शोधक व नाशक पथक ते गाडी उभी असलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.