क्षुल्लक वादातून श्रीरामपुरात गोळीबार; पाचजण जखमी, आरोपींना अटक

948

अंगणात खेळणाऱ्या मुलांच्या वादातून शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झाले, तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने दोघे आरोपी जखमी झाले. जखमींवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. शेख रफद शेख रशीद (वय 26, रा. औरंगाबाद), सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (वय 32, रा. अन्सार कॉलनी, गट 6, प्लॉट नं. 9, पढेगाव, ता.जि. संभाजीनगर) अशी आरोपींची, तर शरीफ रशिद शेख, जमील रशिद शेख, फरीद रशिद शेख (रा. हुसेननगर, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) अशी जखमींची नावे आहेत.

मंगळवारी दुपारच्या वेळी घरासमोर मुलांचा गोंगाट सुरू असताना त्यांना रिजवाना फरीद शेख यांनी हटकले. या कारणातून शेजारी राहणाऱ्या रिजवाना शेख व मेहरूनिसा शेख यांच्या कुटुंबात वाद झाले. हा वाद शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. याठिकाणी दोन्ही कुटुंबियांच्या वतीने परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी दोन्ही कुटुंबाला समज देण्यासाठी पोलिसांनी ठाण्यात पाचारण केले होते. दोन्ही कुटुंबीयांशी पोलिसांची चर्चा झाल्यानंतर ते घरी आले होते.

दरम्यान, मेहरूनिसा हिने संभाजीनगर येथील नातेवाईक सय्यद मुजीब व शेख रफद यांना बोलावून घेतले. ते आल्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास या दोन्ही कुटुंबियांमध्ये पुन्हा वाद झाला. यात सय्यद मुजीब व शेख रफद यांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात शरीफ, जमील व फरीद हे तिघे जखमी झाले. जमील याच्या छातीला, तर फरीदच्या हाताला एक गोळी चाटून गेली. तसेच एक गोळी अवकाशात, एक खाली जमिनीत यांसह आणखी एक अशा पाच गोळ्या झाडल्याची चर्चा घटनास्थळी होती. या गोळीबारानंतर दोघेही पळून जाताना ते रस्त्यावर पडल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. जखमींना तातडीने येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवरही येथेच उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या