निगडीत भंगार व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मित्रांसोबत थांबलेल्या एका भंगार व्यावसायिकाला किरकोळ भांडणाच्या कारणावरून गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोघांनी दोन पिस्तूलमधून भंगार व्यावसायिक आणि त्याच्या मित्राच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. ही घटना रविवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास सेक्टरक्रमांक 22, निगडी येथील बिल्डिंग क्रमांक 7 समोर घडली. प्रशांत रमेश कोळी (वय 32), सुरज पवार (वय 28), राहुल सोनकांबळे (वय 28, तिघे रा. सेक्टर क्रमांक 22, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत भरत ज्ञानोबा थोरात (वय 28, रा सेक्टर क्रमांक 22, आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भरत भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या भावासोबत आरोपींचे शिवीगाळ करण्यावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपी रविवारी एका स्विफ्ट कारमधून आले. त्यावेळी भरत बिल्डिंग क्रमांक सातसमोर मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. आरोपी तिथे आले आणि भरत व त्यांचा मित्र रफिक यांना म्हणाले ‘तुम्हाला गोळ्या घालतो’. त्यानंतर आरोपी प्रशांत कोळी आणि सुरज पवार यांनी त्यांच्या हातातील पिस्तुलातून भरत आणि त्यांचा मित्र रफिक यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.

आरोपींनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपापल्या घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करून घेतल्याचे भरत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, “घटना घडल्यानंतर तात्काळ आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरु आहे.”