अ‍ॅमेझॉनवर पहिली ऑर्डर कुणी आणि कशाची दिली? वाचा खास लेख

2274

>>विजय बेंद्रे

माझ्या संग्रहात असलेल्या पुस्तकांपैकी 60 % पुस्तकं अ‍ॅमेझॉनवरून खरेदी केलेली आहेत. ऑफलाईन पुस्तकांच्या दुकानांवर माझं प्रेम आहेच आणि तितकंच प्रेम मी अ‍ॅमेझॉनवर करतो. कारण मला हवी असलेली आणि सहज न मिळणारी पुस्तकं अमेझॉनवर सापडतात. अ‍ॅमेझॉन मी गेली चार वर्ष वापरतोय. ह्या चार वर्षात माझ्या चार-पाच अ‍ॅमेझॉन युजर आयडी बदलून झाल्यात. काहीना काही कारणाने कुठलीही अशी एक स्थिर आयडी मला ठेवता आली नाही. आज मी वापरत असलेली युजर आयडीचं वय फक्त एक वर्षाचं आहे. अशा परिस्थितीमुळे मी अ‍ॅमेझॉनवरून पहिली ऑर्डर कोणती दिली हे आठवत नाही, ना त्याचा कोणता रेकॉर्ड माझ्याकडे आहे. पण मी कुठलंतरी एक पुस्तक मागवलं असेल हे मात्र नक्की. कारण पुस्तकांसाठीच मी अ‍ॅमेझॉनकडे वळलो. आता ते पुस्तक माझ्या बुकशेल्फमध्ये आहे की नाही हेही ठामपणे सांगता येणार नाही. जेव्हा अ‍ॅमेझॉनच्या पहिल्या ऑर्डरची गोष्ट वाचली तेव्हा मला दुःख झालं की निदान माझं माझ्या पुरती तरी मी अ‍ॅमेझॉनवर पहिली कोणती ऑर्डर दिली हे माहित असायला हवं होतं. हे झालं माझं पण अमेझॉनच्या पहिल्या ऑर्डरची गोष्ट वेगळी आहे. अ‍ॅमेझॉन जेव्हा सुरु झालं तेव्हा पहिली ऑर्डर कुणी दिली व नेमकं त्या ऑर्डरमध्ये काय होतं व त्याचा अ‍ॅमेझॉनच्या वाटचालीशी पुढे काय संबंध राहिला ह्या दरम्यानची साखळी समजून घेणं फार विलक्षण आहे.

खलायडा लॅब्स (Kaleida Labs) ही कॉम्पुटर क्षेत्रात दुसऱ्या टप्प्याच्या काळात कार्यरत असलेल्या ऍपल आणि आय.बी.एम ह्या दोन प्रख्यात कंपनींसोबत जॉईंट व्हेंचर म्हणून जोडली गेली होती . Kaleida Labs मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉन वेनराईट (John Wainwright) आणि शेल कॅपहन (Shel Kaphan) हे दोघेजण इतर कर्मचाऱ्यांसोबत काम करत होते. एकत्रित काम करणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तींना जराही कल्पना नसेल की भविष्यात नावारूपाला येणाऱ्या एका भव्य कंपनीच्या इतिहासातील पहिल्या पानावर त्यांचं नाव असेल. 1994 च्या एप्रिल महिन्यात कॅपहनने खलायडा लॅब्स सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्यण विचित्र होता.

कॉम्पुटर क्षेत्रातील दुसऱ्या टप्प्याची चाहूल जगाला लागली होती. ह्या क्षेत्राचा योग्य तो वापर करून काहीतरी नवं घडवण्याच्या प्रयत्नाला अनेकजण जुंपले होते. विज्ञान, राजकारण आणि व्यापार यांच्या दरम्यान लागलेली स्पर्धा नवनव्या संधींना अप्रत्यक्षपणे उपलब्ध करून देण्याची भूमिका निभावत होती. ह्या काळाच्या दरम्यान जेफ बेझोस ह्या अवलियाच्या मनात एक कल्पना आकार घेत होती. ऑनलाईन विश्वाची दारं उघडत असताना त्या दाराकडे नुसतं बघत राहणं बेझोसला जमत नव्हतं. त्याच्या मनात ऑनलाईन बिझनेसची एक योजना आकार घेऊ लागली. त्या योजनेसाठी त्याने पुस्तकं निवडली. वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पुस्तकं विकण्याची संकल्पना. बिजनेस मॉडेल त्याच्या मनात आकार घेत असताना त्याला गरज होती एका तांत्रिक गोष्टींच्या मदतीची. बेझोस एक कॉम्पुटर तंत्रज्ञानाबाबत कुशल आणि त्याच बरोबर कल्पक मनाच्या माणसाच्या शोधात होता. त्याच्या मित्र परिवारातही शोध सुरु असताना त्याच्या एका शाळकरी मित्राने शेल कॅपहन हे नाव सुचवलं. त्याच दरम्यान कॅपहनही काही नवा उद्योग सुरु करण्याच्या विचारात होता. त्याच्याकडे कॉम्पुटरचं अनुभवी ज्ञान होतं. 1970 नंतर कॉम्पुटरच्या पहिल्या टप्प्यात काम करण्याचा थोडाअधिक अनुभव होता. पण त्यावेळी त्याने पुरेपूर त्याचा योग्य तो उपयोग करून घेतला नाही असं त्याला सतत वाटायचं. त्यामुळे त्याला ह्या दुसऱ्या टप्प्यात त्याचं कर्तृत्व सिद्ध करायचं होतं. तंत्रज्ञानाची जोड देऊन एक व्यवसाय उभारण्याचं स्वप्न तो बघत होता. पण त्यासाठी त्याला एका व्यावसायिक माणसाची गरज होती. आणि असं असतानाच बेझोसला कॅपहन मार्च-एप्रिल 1994 च्या दरम्यान भेटला. त्या भेटीत बेझोसने कॅपहनला त्याच्या नव्या व्यवसायात एक टेक्निकल सपोर्ट म्हणून काम करण्याची ऑफर दिली. संकल्पना वेबसाईटवरून ऑनलाईन पुस्तकं विकण्याची.

व्यावसायिकतेची सगळी गणितं बेझोसने मनामध्ये ज्या प्रकारे मांडली होती त्याप्रमाणे त्याने त्यावर काम करणं सुरु केलं होतं. वेबसाईटच्या डिझाईन पासून त्यातील कमीअधिक पाहणं हे कॅपहनच्या कामाचं प्राथमिक स्वरूप असेल असा एकूणच विचार बेझोसने मांडला. ह्या पहिल्या भेटीनंतर अधिकृतपणे 1994 च्या ऑक्टोबरला कॅपहन बेझोसच्या व्यवसायाला पूर्णपणे जोडला गेला. तोपर्यंत कंपनीचं नाव ठरलं नव्हतं. ऑक्टोबर नंतर बेझोसने एक नाव ठरवलं. cadabra (कॅडबरा). जादूगार त्याची जादू सादर करण्याच्या आधी एक मंत्र उच्चारणासारखं किंवा जादूची कमाल दाखवण्यासाठी एक ओळ abra cadabra (अब्राकॅडबरा) म्हणतो त्यातलाच एक शब्द cadabra. हे नाव बेझोसने ठरवल्यावर त्याबाबत कॅपहनला त्याचं मत विचारलं तेव्हा त्या नावाच्या उच्चारातून एकूणच कंपनीच्या प्रोडक्टवर प्रभाव पडत नाही व cadabra चा उच्चार बऱ्याचदा चुकीचा केला जातोय हे बेझोसच्या निदर्शनास आणून दिलं. बेझोसने नावावर पुन्हा विचार केला व त्याने दुसरं नाव शोधलं ‘अ‍ॅमेझॉन’. जगातील एका विशाल नदीचं नाव. अ‍ॅमेझॉन नदीच्या एकूणच स्वभावानुसार आणि अस्तित्वानुसार व्यवसाय उभा राहावा असा बेझोसचा विचार होता. एप्रिल 1994 ते मे 1995 ह्या वर्षभराच्या काळात अ‍ॅमेझॉनची वेबसाईट आणि त्याचे कामकाज ही अत्यंत मर्यादित स्वरूपात म्हणजे मित्रपरिवारपुरती एक सराव म्हणून चालू होती. बेझोसला कुठलीही घाई नव्हती. त्याला त्याची एकूणच व्यवसायाची बैठक ही अतिशय शिस्तबद्ध करायची होती. 1994 एका गॅरेजच्या ठिकाणाहून सुरु झालेल्या प्रवासात कॅपहन हा अ‍ॅमेझॉनचा पहिला अधिकृत कर्मचारी झाला. कॅपहन झपाटल्यागत त्याचा मित्र पॉल डेविस(अ‍ॅमेझॉनचा दुसरा कर्मचारी)सोबत अ‍ॅमेझॉनची वेबसाईट उभारण्याचं आव्हान व इतर तंत्रज्ञानाची भर घालण्याचं काम वर्षभर मेहनत घेऊन करत होता.

त्याचा निर्यण विचित्र होता. कारण खलायडा लॅब्स (Kaleida Labs) मधून जेव्हा कॅपहन काम सोडणार हे नक्की झालं तेव्हा जॉन वेनराईटला वाटलं की कुठेतरी मोठया पगाराची नोकरी मिळाली असेल म्हणून तो काम सोडत असावा. पण जेव्हा मूळ कारण समजलं तेव्हा त्याला तो वेडेपणा वाटला. ऑनलाईन पुस्तकं विकण्याची कल्पना वेनराईटला धाडसाचं आणि तितकंच विचित्र वाटलं आणि अशा कामासाठी कॅपहन त्याची स्थिर नोकरी सोडतोय हे त्याला अधिकच विचित्र वाटलं. त्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यात अ‍ॅमेझॉनसाठी काम करत असताना अधून मधून कॅपहन वेनराईटला भेटायचा. 1995 च्या मार्च महिन्यात बेझोसने ठरवलं की त्याच्या मित्रपरिवारा व्यतिरिक्त इतर कुणालातरी अधिकृतपणे अमेझॉनच्या वेबसाईटवर रजिस्टर करून आयडी बनवण्याचं सुरु करून बघायचं. बेझोसने तशी कॅपहनला कल्पना दिली. कॅपहनने वेनराईटला अमेझॉनच्या वेबसाईटवर त्याला त्याची आयडी रजिस्टर करायची विनंती केली. आणि काही ऑर्डर करण्यास सांगितलं. वेनराईटने त्याप्रमाणे त्याची माहिती रजिस्टर करून त्याची अधिकृत आयडी बनवली. 3 एप्रिल 1995 च्या सोमवारी वेनराईटने अमेझॉनवरून पहिल्या पुस्तकाची ऑर्डर दिली. अ‍ॅमेझॉनची पहिली अधिकृत ऑर्डर. ऑर्डर केलेल्या पुस्तकाचं नाव होत. ‘Fluid Concepts and Creative Analogies: Computer Models of the Fundamental Mechanisms of Thought- by Douglas Hofstadter’. एकूणच ह्या पुस्तकात नव्वदच्या दशका दरम्यानच्या मानसशास्त्राची, तत्त्वज्ञानाची, कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्या शक्यतेची आणि येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाची संशोधनात्मक चर्चा आहे. नावावरून व त्यातील असणाऱ्या विषयावरून सामान्य वाचकाला थोडं कठीण जाण्यातलं पुस्तक. ह्या पुस्तकाची ऑर्डर वेनराईटने दिली खरी पण तेव्हा ते पुस्तक अमेझॉनच्या स्टॉक मध्ये नव्हतं. बेझोसने अमेझॉन या नावाबरोबरच एक टॅगलाईन जोडली होती Earth’s Biggest Bookstore म्हणून. अशी टॅगलाईन जोडलेली असतानाच पहिल्याच ऑर्डरमध्ये नेमकं तेच पुस्तक स्टॉकमध्ये नसणं हे बेझोसला आव्हान देणारं होतं. पण पहिल्या ग्राहकाला नाराज करू नये म्हणून बेझोस स्वतः एका पुस्तकाच्या दुकानात गेला आणि वेनराईटने ऑर्डर केलेलं पुस्तक त्या दुकानातून खरेदी केलं. नंतर वेनराईटनेच्या ऑर्डरची प्रकिया पूर्ण करून यशस्वीपणे पहिली ऑर्डर वेनराईटनेपर्यंत पोचवली. अ‍ॅमेझॉनच्या इतिहासातील कंपनीच्या संबंधित नसलेल्या व बेझोसच्या मित्रपरिवाव्यतिरिक्त व्यक्तीने दिलेली अधिकृत पहिली ऑर्डर होती. एका मुलाखतीत वेनराईटने विचारलं गेलं की तुम्ही नेमकं Douglas Hofstadte यांचं पुस्तक का मागवलं ? त्यावर वेनराईटने उत्तर दिलं की ‘1995 च्या मार्च- एप्रिल महिन्यात जॉन ग्रिशम हा लोकप्रिय लेखकाचं ‘द रैनमेकर’ ( the rainmaker )हे पुस्तक सर्वाधिक खपाच्या पहिल्या क्रमांकावर होतं. मीही ते पुस्तक मागवू शकलो असतो पण Douglas Hofstadte यांचं पुस्तक मागवलं कदाचित ते माझ्या उपयोगाचं वाटलं म्हणून . ‘Earth’s Biggest Bookstore वरून आज अमेझॉन The Biggest Store on Earth म्हणून ओळखलं जातं. सुरुवातीला फक्त पुस्तकं विकणाऱ्या अ‍ॅमेझॉनने आज प्रचंड मोठा पल्ला गाठलाय. अ‍ॅमेझॉनच्या कॅम्पस मधील असलेल्या काही बिल्डिंगपैकी एका बिल्डिंगच नाव Wainwright ठेवलेलं आहे. अ‍ॅमेझॉनच्या पहिल्या ग्राहकाचा तो सन्मान. त्या बिल्डिंगच्या दर्शनी भागात एका छोट्या बोर्डवर लिहिलं आहे “जॉन वेनराईट हे अ‍ॅमेझॉनचे पहिले अधिकृत ग्राहक आहेत. त्यांनी 3 एप्रिल 1995 सोमवार रोजी अ‍ॅमेझॉनवरून पहिल्या ऑर्डरच्या स्वरूपात ‘Fluid Concepts and Creative Analogies: Computer Models of the Fundamental Mechanisms of Thought- by Douglas Hofstadter’ हे पुस्तक घेतलं होतं .’ तसेच एका भागात मोठ्या अक्षरात Wainwright असं म्हणून बिल्डिंगचं नाव. (पत्ता 535 Terry Avenue). आजही वेनराईट यांच्याकडे अ‍ॅमेझॉनवरून मागवलेलं पुस्तक आहे. त्यांनी सोबत आलेलं बिल व त्याचं पॅकेजिंग जपून ठेवलंय. ते गमतीने असंही म्हणतात की मी जेफची वाट बघतोय कधीतरी जेफ बेझोस स्वतः मला भेटायला येईल आणि माझ्याकडील अ‍ॅमेझॉनवरून मागवलेल्या पहिल्या ऑर्डरच्या पुस्तकाच्या बदल्यात मोठी रक्कम देऊन ते पुस्तक घेऊन जाईल.

योगायोग असा आहे की आज (23 एप्रिल 1995 ते 23 एप्रिल 2020) UNESCO ने सुरु केलेल्या जागतिक पुस्तक दिनाला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. आणि त्यासोबतच अ‍ॅमेझॉनला दिलेल्या पहिल्या ऑर्डरला (3 एप्रिल 1995 – 3 एप्रिल 2020) याच महिन्यात पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. मी स्वतः अ‍ॅमेझॉनवर चार वर्षापूर्वी कुठलं पहिलं पुस्तक ऑर्डर केलं ते आठवत नाही. पण पुस्तकाच्या दुकानातील पहिल्या ग्राहकाची गोष्ट असेल तर दोन वर्षांपूर्वी कल्याण मधील भूषण कोलते व श्रीपाद चौधरी या मित्रांनी सुरू केल्याला ‘पपायरस ‘ ह्या पुस्तकांच्या दुकानाचा पहिला अधिकृत ग्राहक मी आहे. तेव्हा मी निखिलेश चित्रे यांच्या ‘आडवाटेची पुस्तकं’ ह्या पुस्तकाच्या दोन प्रति घेतल्या होत्या. आणि आता मला ते वेनराईट इतकंच खास वाटतंय.

आपली प्रतिक्रिया द्या